भररस्त्यात कोरोना रुग्ण पडल्याच्या व्हिडिओने पुणेकरांचा थरकाप.. पण जबाबदारी कोणी घेईना

पुण्यातील परिस्थिती किती बिकट झाली आहे. रस्त्यावर कोरोना रुग्ण कोसळू लागले आहेत, अशा चर्चा त्यामुळे सुरू झाल्या.
भररस्त्यात कोरोना रुग्ण पडल्याच्या व्हिडिओने पुणेकरांचा थरकाप.. पण जबाबदारी कोणी घेईना
mock drill by pmc on deccan

पुणे : पुण्यातील वर्दळीच्या असलेल्या डेक्कन भागातील नामदार गोपाळकृष्ण गोखले चौकात (गुडलक) एक रुग्ण रस्त्यावर कोसळला. भरचौकातच तो कोसळलाय पण त्याकडे कोणी पाहत नाही. शेजारी पोलिस स्वस्थपणे उभे आहेत. येणारेजाणारे त्याकडे लक्ष देत नाही.  काही वेळात रुग्णवाहिका येते. त्या रुग्णाला घेऊन जाते, असा हा व्हिडीओ पुण्यातील प्रत्येकाच्या `व्हाटस अप`वर आला.

पुण्यातील परिस्थिती किती बिकट झाली आहे. रस्त्यावर कोरोना रुग्ण कोसळू लागले आहेत, अशा चर्चा त्यामुळे सुरू झाल्या. तो व्हिडीओ कुठे फाॅरवर्ड करू नका. लोकांत घबराट पसरेल, अशाही सूचना लोक करू लागले. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णांची संख्या सोळा हजारांहून अधिक असल्याने पुणेकरांत आधीच चिंता असल्याने या व्हिडीओने अनेकांचा थरकाप उडाला.

याबाबत अधिक चौकशी केली असता डेक्कन पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक लगड यांनी असा काही प्रकार झाला नसल्याचे सांगितले. ते महापालिकेचे माॅक ड्रिल असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डाॅ. वावरे यांना याबाबत दूरध्वनी केला असता ते ड्रील आम्ही केलेले नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेले असावे, असे सांगितले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे गणेश सोनुने यांच्याकडे चौकशी केली असता ते आम्ही केलेले नाही. आम्ही केले असते तर त्याची पूर्वकल्पना पोलिसांना आणि माध्यमांना दिली असती, असे सांगितले.

यावर पोलिस निरीक्षक लगड यांना पुन्हा दूरध्वनी केला असता त्यांनी पोलिसांचा आणि या माॅक ड्रिलचा काही संबंध नाही. रुग्णवाहिका किती वेळात, येते हे पाहण्यासाठीच ते केले असल्याचे व्हीडीओतून दिसते. संबंधित विभाग त्याची जबाबदारी घेत नसेल तर त्याला आम्ही काय करणार?

याबाबत क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले की या क्लिपमुळे अनेकांच्या डोक्याला ताप झाला. आपल्याकडेही रुग्ण रस्त्यावर पडायला लागले का, अशी विचारणा होऊ लागली. याबाबत पोलिसांशी बोलल्यानंतर माॅक ड्रील असल्याचे स्पष्ट झाले. मात्र सध्या संकटाच्या काळातील असा प्रकार जीवघेणाच आहे. लोक मोठ्या प्रमाणात घाबरलेले होते.

पुणे शहरात आतापर्यंत 7 हजार 672 रुग्ण ठणठणीत झाले आहेत. दुसरीकडे, आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 518 झाली आहे, तर सध्या साडेचार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहे. विविध रुग्णालयांतील 280 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 55 जण व्हेंटिलेटरवर आहेत. मृतामध्ये पाच पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. त्यांचे साधारण वय 30 आणि 50 वर्षांच्या पुढे आहे. विश्रांतवाडी, दत्तवाडी, कात्रज, कोंढवा, कोथरूड, वाकडेवाडी येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांच्या तपासणीचा वेग पुन्हा वाढला असून, दिवसभरात 3 हजार 227 नागरिकांची तपासणी झाली आहे. ही माहिती 22 जूनपर्य़ंतची आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in