उरुळी, लोणी ग्रामपंचायत निवडणुकीत मताला पाच हजारांचा भाव फुटला

"दोन-चार गुंठे जमीन विकू; पण समोरच्याची जिरवूच'
उरुळी, लोणी ग्रामपंचायत निवडणुकीत मताला पाच हजारांचा भाव फुटला
Uruli Kanchan, Loni Kalbhor Gram Panchayat election price of Rs 5,000 per vote

लोणी काळभोर (जि. पुणे) : जिल्ह्यात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी असलेल्या उरुळी कांचन, लोणी काळभोर, शिंदवणेसह पूर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत एका मताला हजार रुपयापासून पाच हजार रुपयांपर्यंतचा भाव फुटल्याची चर्चा आहे. "दोन-चार गुंठे जमीन विकू; पण समोरच्याची जिरवूच' या विचारातून बहुतांश तरुणाई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. 

पूर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत उतरलेल्या उमेदारांना पैशापैक्षाही प्रतिष्ठा मोठी वाटू लागली आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी उमेदवार एक एका मतासाठी हजार रुपयापासून पाच हजार रुपयांपर्यंत रोकड मोजत असल्याचा चर्चा आहे. पूर्व हवेलीतील इतर ग्रामपंचायतीच्या तुलनेत उरुळी कांचमध्ये मताला सर्वाधिक बाजारभाव फुटल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत 55..... पंच्चावन्न उमेदवारांकडून किमान दहा ते बारा कोटींचा चुराडा होणार असल्याची चर्चा आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जेवढ्या चर्चेच्या असतात, तेवढ्याच त्या खर्चाच्याही असतात. त्याहीपेक्षा जास्त महत्व उरुळी कांचन, लोणी काळभोर, शिंदवणेसह पूर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीना आले आहे. निवडून येणे हाच एकमेव निकष डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपापल्या प्रभागांमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने, आश्वासने, तसेच पैशाचे वाटप आणि पार्ट्यांची धूम हेच चित्र सध्या पूर्व हवेलीतील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. 

हवेली तालुक्‍यातील 54 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात पूर्व हवेलीतील मोठ्या ग्रामपंचायतीतील लोणी काळभोर, सोरतापवाडी, थेऊर, उरुळी कांचन या ठिकाणी सध्या ग्रामपंचायतीच्या आखाड्यात प्रचाराचे शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांकडून प्रचार पत्रके, बैठका, प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. 

दरम्यान, अनेक गावांत गटागटाने हॉटेल, धाब्यांवर जेवणावळी दिल्या जात आहेत. मोठ्या ग्रामपंचायतीत व ज्या ठिकाणी तुल्यबळ लढत आहे, अशा अटीतटीच्या लढतीच्या ठिकाणी मतांसाठी अर्थपूर्ण व्यवहार केला जात आहे. एक एक मतासाठी उमेदवार मतदारांची इच्छा पूर्ण करताना दिसत आहेत. 

हॉटेल-ढाबे हाऊसफुल्ल 

ग्रामपंचायत निवडनुकीत प्रचाराला दोनच दिवस राहिल्याने ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच हॉटेल हाऊसफुल्ल झाले आहेत. सर्वच हॉटेल व ढाब्यावर दररोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. काही हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. काही हॉटेलमध्ये मद्य विक्रीला परवानगी नसताना सहज मद्य मिळत आहे. हॉटेलबरोबरच बहुतांश उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या जेवणावळीसाठी आचारीच नेमले आहेत. सकाळ दुपार व संध्याकाळ कार्यकर्ते मेजवानीवर तुटुन पडत आहेत. 


कोरोनामुळे लॉकडाऊन काळात काम धंदे बुडल्यामुळे, सर्वसामान्य जनतेला आर्थिक झळ सोसावी लागली. मात्र, लोणी काळभोर, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवार हे मतदाराला एका मतासाठी दोन ते पाच हजार रुपये देत असल्याने नागरीकांची चांदी होऊ लागली आहे. येईल तो आपला आणि देईल तो आपलाच या नात्याने मतदार दोन्ही बाजूकडून पैसे घेत आहेत. मतदानाला आणखी दोन दिवस वेळ असल्याने मतांचा भाव आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in