आंबेठाण : एखाद्यावर संकटे आले तर किती यावीत? यालाही काही मर्यादा असतील. पण, जर संकटांची मालिकाच सुरू झाली तर...? वहागाव (ता. खेड) येथील तानाजी अनंता नवले यांच्यावर निसर्ग वादळामुळे अशीच एकापाठोपाठ एक संकटे ओढावली. वादळाने नवले कुटुंबाचे घर भूईसपाट झाले आहे. यात मायलेकाचा मृत्यू झाला असून इतर सदस्य जखमी झाले आहेत.
सुरुवातीला भयानक चक्री वादळाचा सामना करीत असताना रक्ताचे पाणी करून नव्याने बांधलेल्या घराचे छप्पर उडून गेले. एवढे कमी की काय त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे घर कोसळले. हे अस्मानी संकट सुरू असताना या घटनेत जबर मार लागून आईचा जागीच मृत्यू झाला, तर स्वतःसह अन्य कुटुंब जखमी झाले. या घटनेत जखमी झालेल्या लहान भावाचा दुसऱ्या दिवशी दवाखान्यात मृत्यू झाला, अशी संकटांची मालिकाच नवले परिवाराच्या आयुष्यात सुरू झाली. मायलेकाचे मृतदेह शेजारी शेजारी जळताना पाहून अनेकांना आश्रू आवरणे कठीण झाले होते. जीवनात अशी वेळ कोणावरही येऊ नये, अशी भावना सर्वजण व्यक्त करत होते.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वहागाव येथे तानाजी अनंता नवले यांनी शेतात नव्याने घर बांधले आहे. यात ते एकत्रित कुटुंबासह राहत होते. बुधवारी (ता. 3) झालेल्या वादळी पावसात या घरावरील छप्पर पूर्णपणे उडून गेले. याशिवाय घराच्या भिंती पडून घर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे भुईसपाट झाले आहे. या घटनेत तानाजी नवले यांच्या आई मंजाबाई अनंता नवले (वय 65) यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत मंजाबाई नवले यांचे मुलगे आणि नातू या जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतु जखमींपैकी नारायण अनंता नवले (वय 38) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, तहसीलदार सुचित्रा आमले, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, काळुराम पिंजण यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या नवले कुटुंबाला मदतीचे आवाहन केले होते. या दुर्दैवी घटनेने केवळ गावातच नव्हे; संपूर्ण खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, अमोल पवार, चांगदेव शिवेकर, संजय मोहिते, सुनील देवकर यांनी गावात जाऊन नवले कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

