Two corporators and 30 activists in the Thorat-led agitation | Sarkarnama

थोरातांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात दोन नगरसेवक आणि 30 कार्यकर्ते 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 29 जून 2020

इंधन दरवाढीचा निषेध करणासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज (ता. 29 जून) पुण्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला 25-30 कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे : इंधन दरवाढीचा निषेध करणासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज (ता. 29 जून) पुण्यात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला 25-30 कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

या उपस्थितीबद्दल विचारल्यानंतर थोरात यांनी शहर कॉंग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही. काहीजण कामात अडकले असतील. मात्र, ते जेथे असतील तेथूनच त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. 

इंधन दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसच्या वतीने देशभर आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा भाग म्हणून पुण्यातही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला दोन नगरसेवक आणि काही मोजके पदाधिकारी उपस्थित होते. इतर कुणीही या आंदोलनाकडे फिरकले नाही. लॉकडाउन असल्याने केवळ 25 लोकांची परवानगी पोलिसांकडून घेण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संख्येचे बंधन असल्याने काही ठाराविक पदाधिकाऱ्यांनाच निरोप देण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

शहर कॉंग्रेसमध्ये पूर्वापार गटबाजी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षातील गटबाजी नव्याने उफाळून आली आहे. राज्यपाल नियुक्त आमदाराकीसाठी पुण्यातून तब्बल पाचजण इच्छुक आहेत. त्यातून गटबाजी आणखी वाढली आहे. गेल्या कित्येक वर्षात पुणे शहर कॉंग्रेसकडे एकमुखी नेतृत्व नाही. परिणाम पक्ष गटातटात विभागला आहे. 

माजी खासदार आणि शहर कॉंग्रेसचे एकेकाळचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी राजकारणात सक्रिय नाहीत. कलमाडी यांच्यानंतर पक्षात एकमुखी नेतृत्व नाही. त्यामुळे त्यांच्याच अनेक समर्थकांमध्ये फूट पडून वेगवेगळे गट निर्माण झाले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून प्रदेशाध्यक्ष थोरातांच्या नेतृत्वाखालील आंदोलनालादेखील 25-30 जणांची उपस्थिती होती. मात्र, हे अपयश लपविण्यासाठी पोलिसांच्या 25-30 जणांच्या परवानगीचे कारण सांगण्यात येत आहे. 

या संदर्भात थोरात यांनी केलेला खुलासा आणि समर्थन अधिक हास्यास्पद आहे. शहर कॉंग्रेसमध्ये कोणतेही गटतट नाहीत, तसेच कार्यकर्ते जिथे कुठे असतील तेथून त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 

शहरातील गटतट एकत्र आणण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न झाले. मात्र, राज्य पातळीवरील एकाही नेत्याने पुण्यातील गटबाजी संपण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. अनेकवेळा सांगूनही पक्षातील वरिष्ठ पुण्यात लक्ष घालायला तयार नाहीत. शहरात एकजण कुणीच नेतृत्व करू शकत नाही, त्यामुळे ही गटबाजी राहणारच, असे सांगत यावर पांघरून घालण्यात येत आहे. त्यामुळे गटबाजी कमी होण्याऐवजी वाढत असून त्याचा फटका पक्षाचा पाया आणखी कमकुवत होण्यावर होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख