Two BJP MLAs in Pune added to Corona's list | Sarkarnama

कोरोनाच्या यादीत पुण्यात भाजपच्या दोन आमदारांची भर 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 7 जुलै 2020

पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे तीन विद्यमान आमदार, एक माजी आमदार आणि पुण्याचे महापौर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे, दौंडचे आमदार राहुल कुल, कसब्याच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक, हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे तीन विद्यमान आमदार, एक माजी आमदार आणि पुण्याचे महापौर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे, दौंडचे आमदार राहुल कुल, कसब्याच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक, हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे. 

दरम्यान, यातील लांडगे यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर कुल आणि टिळक यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आजच (ता. 7 जुलै) आला आहे. टिळेकर आणि मोहोळ यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

गेल्या आठवड्यापासून पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना संसर्ग झाल्याने उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांचा मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.  

दरम्यान, दौंडचे आमदार राहुल कुल यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या घरातील इतर सदस्यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. ते सध्या पुण्यातील घरी क्वारंटाइन असून त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत, असे कुल यांच्या कुटुंबीयांनी कळविले आहे. याबाबत स्वतः कुल यांनीही फेसबुक पोस्ट लिहिली आहे. 

कुल हे एक जुलै रोजी दौंडमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते, त्या वेळी एक ज्येष्ठ पदाधिकारी खोकत होते. त्यानंतर कुल हे दिल्लीला गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांना समजले की संबंधित पदाधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे, त्या वेळी त्यांनी खबरदारी म्हणून तपासणी केली असता त्यांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

पुण्याच्या माजी महापौर, कसब्याच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या मातोश्रींचा कोरोना चाचणी अहवाल आज (7 जुलै) पॉझिटिव्ह आला आहे, आमदार टिळक यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आम्हा दोघींना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र, डॉक्‍टरांनी आम्हाला घरीच क्वारंटाइन राहण्यास सांगितले आहे. कुटुंबातील इतर सदस्यांचा कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह आलेला आहे. 

दरम्यान, महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांना, तर माजी महापौर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका वैशाली बनकर यांच्या कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख