Traffic between Pune-Pimpri Chinchwad city resumed | Sarkarnama

पुणेकरांनो... पिंपरीत उद्योग, व्यवसायासाठी खुशाल जा 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

पिंपरी चिंचवडमध्ये उद्योग-व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातून मोठ्या संख्येने कामगार तेथे जातात. त्यामुळे त्यांना पासशिवाय ये-जा करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. दोन्ही शहरांतून व्यावसायिकांची आणि माल वाहतुकीचीही ये-जा सुरू झाली आहे.

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये उद्योग-व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातून मोठ्या संख्येने कामगार तेथे जातात. त्यामुळे त्यांना पासशिवाय ये-जा करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. दोन्ही शहरांतून व्यावसायिकांची आणि माल वाहतुकीचीही ये-जा सुरू झाली आहे. दोन्ही शहरांच्या सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या प्रमुख नीलम जाधव यांनी दिली. 

पुणे, पिंपरी-चिंचवडचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही शहरांच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारने दहा दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडचा रेड झोन काढून घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये 26 मे पासून "पीएमपी'ची वाहतूक सुरू झाली आहे.

बोपोडीतील हॅरीस पूल आणि औंधमधील राजीव गांधी पुलावरील वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. दोन्ही पुलांवर पोलिस आहेत. तसेच, रात्री 9 ते पहाटे 5 दरम्यान दोन्ही शहरांत संचारबंदी कायम राहणार आहे. त्याचीही अंमलबजावणी पोलिस करीत आहेत. या शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची अंमलबजावणी होते की नाही, हेही पोलिस पाहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. 

नीलम जाधव म्हणाल्या की, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरादरम्यानची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दोन्ही शहरांच्या तपासणी नाक्‍यावर पोलिस कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी पोलिस करीत आहेत. तसेच, महामार्गांवरही पोलिस वाहतुकीचे नियमन करीत आहेत. दोन दिवसांपासून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनीही गरजेनुसारच वाहतूक करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 

पुण्यातील वाहतूक शाखेतील सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख म्हणाले,"पुण्यातून पिंपरी-चिंचवडला वाहतूक सुरू झाली आहे. राज्य सरकारने दुचाकीवर एकच व्यक्ती, रिक्षात चालक आणि दोन प्रवासी, मोटारीत चालक आणि दोन प्रवासी, तर लहान मोठ्या बसमध्ये क्षमतेच्या निम्मीच प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलिस करीत आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील वाहतुकीवरील निर्बंध कायम आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रातील वाहतूक अद्याप खुली करण्यात आलेली नाही. तेथील निर्बंध कायम आहेत. 

 

भोसरी औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू झाले आहेत. पुण्यात राहणारे; परंतु या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची वाहतूक नियमितपणे सुरू झाली आहे. त्यासाठी कोणत्याही पासची गरज राहिलेली नाही. या बद्दल पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे उद्योजकांतर्फे आभार मानतो. 
-प्रदीप सिन्नरकर, भोसरीत कारखाना असलेले पुणेकर उद्योजक 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख