पुण्यातील असे तीन गोल्डन मॅन : तिघांचाही अकाली अंत

पुण्यात मोठ्या प्रमाणात सोने अंगावर घालून ते लोकांना दाखविण्याची सुरवात रमेश वांजळे यांनी केली. अनेक लोकांनी त्याचे अनुकरण केले. पण खरे गोल्डन मॅन तिघेच होते. त्यातील दत्ता फुगे यांचा खून झाला. तिसरेसम्राट मोझे यांचे पाच मे रोजी रात्री अकाली निधन झाले.
goldan man of Pune
goldan man of Pune

पुणे : हौस पूर्ण करण्यासाठी माणूस काय करेल ते सांगता येत नाही. त्यात सोन्याची हौस असेल तर ती व्यक्ती चर्चेचा विषय ठरते. पुण्यात असेच तीन `गोल्डन मॅन` होते. पण दुर्देवाचा भाग म्हणजे या तिघांचाही अकाली अंत झाला. पुणे परिसरातील जमिनींना भाव आल्यानंतर सोन्यासाठीची मागणी अचानक वाढली. त्या सोन्याचे प्रदर्शन करण्याचीही प्रथा त्यात सुरू झाली. गोल्डन मॅनला मिळणारी प्रसिद्धी पाहून अनेकांनी त्यांचे अनुकरण केले.

पुण्यातील पहिला गोल्डन मॅन म्हणजे दिवंगत आमदार रमेश वांजळे. वांजळे हे पहिलवान होते. राजकारणात आल्यानंतर त्यांनी आपली सोन्याची हौस पूर्ण करायला  सुरवात केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्यांचा आकार आणि वजन दिवसेंदिवस वाढत गेले. त्यातून त्यांची चर्चा होऊ लागली. धिप्पाड देह, पहिलवानी शरीर, दाढी आणि त्यावर सोन्याचे  वजनदार दागिने यामुळे वांजळे यांचा रुबाब लगेच सामान्यांच्या लक्षात येऊ लागला. त्यांची क्रेझच निर्माण झाली.

वांजळे मूळचे कॉग्रेसचे कार्यकर्ते. पिंपरीत महापालिकेच्या स्मशानभूमीत चौकीदाराचे काम करणारा हा माणूस केवळ स्वकर्तृत्वावर विधानसभेचा आमदार झाला. रसाळ वाणी आणि समोरच्यावर छाप पाडणाऱ्या व्यक्तीमत्वातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार म्हणून वांजळे २००९ साली विधानसभेत पोचले. त्या काळातील त्यांची लोकप्रियता भल्याभल्या राजकारण्यांना हेवा वाटावा, अशी होती. सोने अंगावर घालून ते भाषणात संतवचने पेरीत. रसाळ वाणीने ते जाहीर कार्यक्रमात समोरच्या लोकांना ते मंत्रमुग्ध करीत. आमदार वांजळे यांचा जनसंपर्क दांडगा होता.सुरवातीच्या काळात कॉंग्रेसचे नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांचे कार्यकर्ते म्हणून ते काम करीत होते

राज्यात 2009 मध्ये विधानसभा मतदारसंघांची पुनर्ऱचना झाली. त्यांचे गाव खडकवासला मतदारसंघात आले. आमदार होण्याची वांजळे यांची महत्त्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी राष्ट्रवादीकडे आधी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या अंगावरील सोने पाहून अजित पवारांनीही आश्चर्य व्यक्त केले. तेथून तिकिट मिळणार नसल्याचे समजल्यानंतर वांजळे हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सोन्याने मढवलेल्या अंगासह गेले. ते सोने पाहून राज ठाकरेपण आश्चर्यचकीत झाले. राज यांनी वांजळे यांना सोने कमी घालण्याचा सल्ला दिला. त्यावर वांजळे हे त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने म्हणाले की लोकांना आवडते. म्हणून मी घालतो, असे उत्तर दिले. त्यावर केवळ सणासुदीला किंवा समारंभालाच घालत जा, असा सल्ला दिला. त्यावर वांजळे यांनी आपल्या मतदारसंघात रोज कोणता ना कोणता कार्य़क्रम असतो, असे सांगत रोजच सोने घालावे लागते, असे राज यांना पटवून दिले. त्यामुळे त्या विषयावर राज यांनी त्यांना परत सल्ला दिला नाही.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत वांजऴे हे मनसेच्या चिन्हावर आमदार झाले. त्यामुळे विधानसभेतही वांजळे हे सोनेरी आमदार म्हणून प्रसिद्ध झाले. राज्यभर ते त्यांच्या सोन्यामुळे प्रसिद्ध झाले. मात्र याच वांजळे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नियमित तपासण्यांसाठी म्हणून ते रुग्णालयात गेले. तेथेच वयाच्या 46 व्या वर्षी त्यांचा 10 जून 2011 रोजी अकाली मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूवर कोणाचा विश्वास बसत नव्हता. त्यांच्या अंत्ययात्रेला झालेली प्रचंड गर्दी आजही अनेकांना आठवते. `मैं दिखता हूॅ व्हिलन जैसा मगर काम करता हूॅं हिरो का,` हा आमदार वांजळे यांचा डायलॉग लोक आजही विसरले नाहीत.

वांजळे यांचा मृत्यू झाल्यानंतर गोल्डन मॅन असा कोणी नव्हता. मात्र 2012 मध्ये राष्ट्रवादीचे दत्ता फुगे यांनी सोन्याचा शर्ट शिवला. त्यावर सोन्याची बटणे, सोन्याची फुले, गळ्यात सोन्याच्या चेन, कडे असा पोषाख केला. जगातला सर्वात महागडा शर्ट घालणारी व्यक्ती म्हणून फुगे यांची ख्याती झाली. त्याची गिनेज बुकमध्ये नोंदही झाली. मात्र या फुगे यांचा दुर्देवी अंत झाला. ते फायनान्स स्किम राबवत होते. तसेच एका पतसंस्थेतही ते पदाधिकारी होते. त्यांच्या पत्नी या राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या. स्वतः फुगे यांना 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी भोसरीतून उभे राहण्याची इच्छा होती. मात्र आर्थिक देवाणघेवाणीवरून फुगे यांचे काही जणांशी वितृष्ट आले होते. त्यातून फुगे यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलविणे पाठविले आणि त्यांचा दगडाचे ठेचून खून केला. फुगे यांची दखल `इकाॅनाॅमिस्ट`ने पण घेतली होती. त्यांनी त्यांच्या अंगावर अडीच कोटी रुपयांचे सोने घातले होते. त्यातील शर्ट हा दोन कोटी रुपयांचा होता. 

पुण्यातील तिसरा प्रसिद्ध गोल्डनमॅन व उद्योजक म्हणजे सम्राट हिरामण मोझे. त्यांचे वयाच्या 34 व्या वर्षी हृदयविकाराने पाचे मे रोजी निधन झाले. त्यांच्यामागे आई ,पत्नी ,व दोन लहान मुले आहेत. सम्राट यांचा 28 एप्रिलला वाढदिवस साजरा झाला होता. काल रात्री अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे ते पुतणे होत. सम्राट यांची अंगावर सोन्याचे दागिने घालण्याची स्टाईल वेगळी होती. सुमारे ८ ते १०  किलो सोने ते अंगावर घालत. त्यामुळे त्यांना गोल्डन मॅन, असे नाव पडले होते. सम्राट यांची दखल दूरचित्रवाणी वाहिन्यांनी ही घेतली होती. सम्राट सध्या पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या निधनाने संगमवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून आपली बदनामी केली होत असल्याची सम्राट मोझे यांनी पोलीस सायबर सेलला तक्रार दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com