लॉकडाउनसंदर्भात संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय होणार : अजित पवार - There will be only one decision for the entire state regarding lockdown: Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

लॉकडाउनसंदर्भात संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय होणार : अजित पवार

मिलिंद संगई 
शनिवार, 10 एप्रिल 2021

बारामतीत एक, पुण्यात एक आणि राज्याचा वेगळा निर्णय असे तीन तीन निर्णय घेऊन चालणार नाही.

बारामती : ‘‘पुण्यात आज दुपारी एक मिटिंग होत आहे, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय नेत्यांची एकत्र बैठक मुंबईत बोलावली आहे. त्याला राज्याचे विरोधी पक्षनेतेही उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीत लॉकडाउनसंदर्भात जो निर्णय घेण्यात येईल, तो संपूर्ण राज्यासाठी असेल. तो निर्णय आज संध्याकाळी किंवा उद्या जाहीर करण्यात येईल,’’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना सांगितले. 

बारामतीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि उपाय योजना याबाबतचा आढावा अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बोलावलेले होते. त्यात रुग्णालय व्यवस्थापनापासून रेमडीसेव्हर इंजेक्शन, लसीकरण, बेड उपलब्धता, रुग्णवाहिका या सारख्या अनेक बाबींवर चर्चा केल्याचे पवार यांनी सांगितले. 

बारामतीत एक, पुण्यात एक आणि राज्याचा वेगळा निर्णय असे तीन तीन निर्णय घेऊन चालणार नाही. पण, बारामतीत सोयी सुविधांचा आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना आणि आदेश देण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. बेड, रुग्णवाहिका याची उपलब्धता याचाही आढावा घेतला. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून प्रशासनाने जे निर्बंध घातलेले आहेत, त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सूचना अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले. 

रेमडीसेव्हर इंजेक्शन राज्य सरकारच्या रुग्णालयात कमी पडत नाहीत. पण, खासगी दवाखान्यात त्याची कमतरता भासत आहे, त्या बाबत काही वेगळी कारण पुढं आलेली आहेत. त्यासंदर्भातही चर्चा झाली. पुण्यातील बैठकीत या बाबत सर्वांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही अजितदादांनी नमूद केले.  

दरम्यान, रेमडीसेव्हर इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत एक समिती नियुक्त करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. अनेक ठिकाणी सहा ऐवजी आठ इंजेक्शनचे प्रिस्क्रीप्शन आले आहे, त्यामुळे गोंधळ होतो आहे. पुढील दोन दिवसांत राज्य व जिल्हा स्तरावर रेमडीसेव्हरचा तुटवडा भासू नये, यासाठी नियोजन होईल, असेही ते म्हणाले. 

रेमडीसेव्हरचा काळाबाजार झाल्याची तक्रार अद्याप तरी आलेली नाही.  शासकीय पातळीवर या इंजेक्शनचा तुटवडा नाही, असेही त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यासाठी 50 हजार लसीचे डोस शुक्रवारी प्राप्त झाले असल्याने आता लसीकरणही सुरु होईल, असेही प्रसाद या वेळी म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख