पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवार रात्रीपासून दहा दिवसांचा पुन्हा कडक लाॅकडाऊन

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाने घेतला निर्णय
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवार रात्रीपासून दहा दिवसांचा पुन्हा कडक लाॅकडाऊन
lock down ff

पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड या दोन पोलिस आयुक्तालयातील संपूर्ण हद्दीसह या शहरांजवळील चाकण, वाघोली, हिंजवडी या भागांत येत्या 13 जुलैपासून दहा दिवसांसाठी 23 जुलैपर्य़ंत लाॅकडाऊनची घोषणा आज करण्यात आली. फक्त अत्यावश्यक सेवा या कालावधीत सुरू राहणार आहेत. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ही साखळी ब्रेक झाल्यानंतर कोरोनाच्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी या लाॅकडाऊनचा उपयोग होणार आहे.  

या दोन्ही शहरांत कोरोनाच्या केसेस वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील दोन दिवस जनतेला पूर्वतयारीसाठी देण्यात आले आहेत. दूध, औषधे, भाजीपाला इतक्याच बाबी लाॅकडाऊन काळात सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचा आढावा आज बैठकीत घेतल्यानंतर त्याची घोषणा करण्यात आली.

विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड,  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यानंतर सविस्तरपणे पत्रकारांना माहिती दिली. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंद ठेवायच्या की नाही, याचा निर्णय नंतर जाहीर करण्यात येणार आहे. अतिशय कडक हा लाॅकडाऊन राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे जनतेने सहकार्य करावे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. या लाॅकडाऊनच्या कालावधीचा उपयोग हा काॅन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी, कोविड सुविधा निर्माण करण्यासाठी करण्यात येणार असल्याचे पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर गायकवाड आणि श्रावण हर्डिकर यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवांसाठी पासेस देण्यात येतील. नागरी भागात केवळ मेडिकल दुकानेच सुरू राहणार आहे. पाच दिवसांनंतर लाॅकडाऊनमध्ये सवलत द्यायची की नाही, याचा आढावा घेण्यात येणार आहे. या लाॅकडाऊनचा उपयोग झाला की नाही, याचा प्रत्यय हा जुलैच्या अखेरीस येईल, असे पिंपरी-चिंचवडचे पालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सांगितले. 

पुणे शहराजवळ असलेल्या 22 गावांत आधीच लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यातही आता कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले.   

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in