नाराज मोहितेंच्या वाट्याला तीन समित्या; अण्णा बनसोडे ठरले दादा-भाऊंना भारी  - State Government Legislative Committees Announced | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

नाराज मोहितेंच्या वाट्याला तीन समित्या; अण्णा बनसोडे ठरले दादा-भाऊंना भारी 

उत्तम कुटे 
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

गेल्या काही महिन्यांपासून पक्षश्रेष्ठीवर नाराज असलेले खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांना तीन समित्यांचे सदस्य करण्यात आले आहे.

पिंपरी : कोरोना महामारीचा फटका विधीमंडळ समित्यांनाही बसला आहे. राज्य सरकारच्या या समित्या वर्षभरानंतर नुकत्याच (ता. 5 नोव्हेंबर) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडमधील तीन आमदारांपैकी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना दोन समितीचे सदस्यत्व मिळाले आहे. राज्यात विरोधी बाकावर असणारे शहरातील भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांची प्रत्येकी एका समितीवर सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पक्षश्रेष्ठीवर नाराज असलेले खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांना तीन समित्यांचे सदस्य करण्यात आले आहे. या माध्यमातून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडे झाल्याचे दिसते. 

आमदार बनसोडे यांना सर्वाधिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीचे सदस्यत्व देण्यात आले आहे. याच एकमेव समितीचे अध्यक्षपद विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडे देण्यात आले आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.

बनसोडे यांना ग्रंथालय समितीवरही घेण्यात आले आहे. जगताप यांना उपविधान समिती, तर लांडगे यांना सार्वजनिक उपक्रम समिती देण्यात आली आहे. मावळमधून प्रथमच निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील ऊर्फ अण्णा शेळके यांना दोन समित्या मिळाल्या आहेत. एडस रोगाला प्रभावी प्रतिबंध घालण्यासाठीच्या फोरम तथा समितीसह विशेषाधिकार समितीवरही त्यांना घेण्यात आले आहे. 

दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केलेल्या पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांना तीन समित्यांवर संधी देण्यात आली आहे. त्यांना अंदाज समिती, मराठी भाषा समिती आणि ग्रंथालय समितीवर घेण्यात आले आहे. या तीन समितींच्या माध्यमातून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आला आहे. 

विधान मंडळाच्या 24 समित्यांचे प्रमुख तथा अध्यक्ष आणि सदस्य नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यात पुणे जिल्ह्याला तीन समित्यांची अध्यक्षपदं मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदस्य तथा आमदारांच्या वेतन व भत्ते समिती आणि माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतन समितीचे प्रमुख करण्यात आले आहे. हडपसरचे राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांच्याकडे मराठी भाषा समितीचे अध्यक्षपद देण्यात आलेले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख