राष्ट्रवादीच्या आमदाराचा अजित पवार अर्धाच हट्ट पूर्ण करू शकले 

लोणी काळभोर, वाघोली व लोणीकंद पोलिस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 राष्ट्रवादीच्या आमदाराचा अजित पवार अर्धाच हट्ट पूर्ण करू शकले 
State Government approves division of Pune city and rural police stations

मुंबई : पुणे शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील पोलिस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. तसेच, कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील वाघोली, उरूळी कांचन, नांदेड सिटी बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज (ता. 4 जानेवारी) घेण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी पोलिस दलाला दिल्या. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका आमदाराने पूर्वीचे लोणीकंद, वाघोली (नवे), लोणी काळभोर आणि उरुळी कांचन (नवे) ही दोन पोलिस ठाणी ग्रामीण पोलिस दलात कायम ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, यातील उरुळी कांचन वगळता नवीन तीनही पोलिस ठाणे पुणे शहर आयुक्तालयाशी जोडण्यात आली आहेत. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार हे त्या आमदाराचा अर्धाच हट्ट पूर्ण करू शकले आहेत. 

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आमदार अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, "पीएमआरडीए'चे आयुक्त सुहास दिवसे (व्हीसीव्दारे), पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील चार झोनचे रुपांतर पाच झोनमध्ये करणे, कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आणि योग्य व्यवस्थापनासाठी लोणी काळभोर, वाघोली व लोणीकंद पोलिस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचबरोबर लोणीकंद पोलिस ठाण्यातून नवीन वाघोली पोलिस ठाणे, लोणी काळभोर पोलिस ठाण्यातून उरूळी कांचन पोलिस ठाणे, हवेली पोलिस ठाण्यातून नवीन नांदेड सिटी पोलिस ठाणे, चतु:श्रृंगी व हिंजवडी पोलिस ठाण्यातून नवीन बाणेर पोलिस ठाणे, हडपसर-कोंढवा व वानवडी पोलिस ठाण्यातून नवीन काळेपडळ पोलिस ठाणे, नवीन फुरसुंगी पोलिस ठाणे, चंदननगर पोलिस ठाण्यातून नवीन खराडी तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव अशा नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. 

कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शिरूरमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. तसेच, पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून पुणे शहर पोलिस आयुक्तालयाला आणि जिल्हा ग्रामीण पोलीसांना वाहन खरेदीसाठी प्रत्येकी एक कोटी, तर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. 

राज्यात कायदा-सुव्यवस्था कायम राखली जावी, पोलिस आणि सामान्य जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करण्याच्या सूचना करत पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in