पुण्यातील ते दोन उड्डाणपूल पाडण्यास राज्य सरकारची मान्यता 

गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई-स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल पाडण्यास राज्य सरकारकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. तसेच, विद्यापीठ चौकात दुमजली पूल उभारण्यास आणि त्यासाठी टाटा-सिमेन्स या दोन्ही कंपन्यांबरोबर करार करण्यास राज्य सरकारने पीएमआरडीएला परवानगी दिली आहे.
पुण्यातील ते दोन उड्डाणपूल पाडण्यास राज्य सरकारची मान्यता 
Government approves demolition of two flyovers in Pune

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई-स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल पाडण्यास राज्य सरकारकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. तसेच, विद्यापीठ चौकात दुमजली पूल उभारण्यास आणि त्यासाठी टाटा-सिमेन्स या दोन्ही कंपन्यांबरोबर करार करण्यास राज्य सरकारने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणास (पीएमआरडीए) परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच हे पूल पाडण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. गणेशखिंड रस्त्यावरून ही मेट्रो जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यावर पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी पीएमआरडीएने राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठविला होता. 

हा पूल महापालिकेच्या खर्चातून बांधण्यात आला आहे. त्यामुळे पूल पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून "ना हरकत प्रमाणपत्र' घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पीएमआरडीएने महापालिकेकडे पाठविला होता. लॉकडाउनच्या काळात हे पूल पाडण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती या प्रस्तावात करण्यात आली आहे. 

हे दोन्ही पूल पाडण्यास आणि त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यास राज्य सरकारने पीएमआरडीएला मान्यता दिली आहे. त्याच बरोबरच नवीन पूल उभारण्यास टाटा-सिमेन्स या कंपनीबरोबर काम करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हे दोन्ही पूल पाडून तेथे उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलास सुमारे 260 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा सर्व खर्च पीएमआरडीएकडून केला जाणार आहे. 

मेट्रो प्रकल्पाचे काम टाटा-सिमेन्स या कंपनीला पीएमआरडीएकडून यापूर्वीच देण्यात आले आहे. हा संपूर्ण मेट्रो प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. या कंपनीकडून दोन उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन दुमजली पूल उभारण्याचे काम करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी टाटा-सिमेन्स या कंपनीला पूल पाडण्यासाठी शॉर्ट टेंडर काढण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. 
 

नवीन उड्डाणपूल दुमजली असणार

गणेशखिंड रस्त्यावरील पाडण्यात येणाऱ्या दोन्ही पुलांची मिळून एक किलोमीटर लांबी आहे, तर बारा मीटर रुंदीचे आहेत. त्याऐवजी नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाची लांबी ही 1.7 किलोमीटर असणार आहे. सर्वांत वरचा पूल हा मेट्रोसाठी असणार आहे. तर त्या खालील पुलावर बीआरटी आणि खासगी वाहनांसाठी असणार आहे. नवीन उड्डाणपूल हा चारपदरी असणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

गणेशखिंड रस्त्यावरील पूल पाडण्यास आणि त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासंदर्भात टाटा-सिमेन्स या कंपनीशी करार करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी करण्यात येणारा खर्च हा पीएमआरडीएकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून देखील लवकरच परवानगी मिळेल. 
-विवेक खरवडकर, 
मुख्य अभियंता, पीएमआरडीए 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in