पुण्यातील थरकाप उडवणारी घटना; ‘तुला अक्कल नाही का?’ म्हटल्यानं पोलिसावर रॉडने हल्ला - Shocking incident in Pune; Rod attacked the police for saying, "Don't you have any sense | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यातील थरकाप उडवणारी घटना; ‘तुला अक्कल नाही का?’ म्हटल्यानं पोलिसावर रॉडने हल्ला

दिलीप कांबळे
रविवार, 31 जानेवारी 2021

गुन्हेगारीच्या घटनेमुळे चर्चेत राहणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चाकण येथील मुख्य चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर दोघांनी लोखंडी रॉडने हल्ला केला.

पिंपरी चिंचवड : गुन्हेगारीच्या घटनेमुळे चर्चेत राहणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चाकण येथील मुख्य चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर दोघांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यानं पोलीस कर्मचारी जागीच बेशुद्ध पडला. रॉड लागल्यानं कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कंटेनर मागे घेण्याच्या वादातून दोघांनी हा प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. रवींद्र नामदेव करवंदे (वय ३०) असे जखमी वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी दोन जणांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या. चाकण वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी रवींद्र नामदेव करवंदे हे तळेगाव चाकण चौकात शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास कर्तव्य बजावत होते. तेव्हा, गर्दी असल्याने वाहतूक पोलिसांनी आरोपींना कंटेनर पाठीमागे घेण्यास सांगितला. ‘तुला अक्कल नाही का?’ असं म्हणत पोलीस आरोपींवर ओरडले. 

यावरून वाहतूक पोलीस करवंदे आणि आरोपीमध्ये शाब्दिक वाद झाला होता. पोलीस कर्मचाऱ्याने अक्कल काढल्यानं आरोपींना राग आला. राग मनात धरून दोन्ही आरोपींनी करवंदे हे कर्तव्य बजावत असताना अचानक दुचाकीवर येऊन त्यांच्या डोक्यात पाठीमागून लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर दोघांनी लगेच घटनास्थळावरून पोबारा केला. अचानक झालेल्या हल्ल्यानं करवंदे हे काही क्षणातच भर चौकात कोसळले. 

जागीच बेशुद्ध पडल्याचे पाहून नागरिकांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. 

सदर आरोपीचा शोध घेत असताना चाकण तळेगाव चौक ते म्हाळुंगे असे अनेक सीसीटीव्हींचे फूटेज युनिट तीन चे पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या पथकाने चेक करून आरोपींची माहिती घेतली. दोन्ही आरोपी मुंबई कल्याणला पळून जाणाच्या प्रयत्नात असताना चाकण खराबवाडी येथून शिताफीने ताब्यात घेतले. 

आरोपींची नावे रोहित बाबू साळवी व हर्षदीप भारत कांबळे,अशी असून सदर आरोपीनी त्यांचा कंटनेर चाकण चौकात गर्दीमध्ये पोलिसाने पाठीमागे घेण्यावरून वाद केल्याने त्याचा राग मनात धरून सदरचे कृत्य केल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली आहे, पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख