शिवसेनेची खासदार कोल्हेंवर कडवट टीका : सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका - Shivsena criticizes NCP MP Amol Kolhe in harsh language | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

शिवसेनेची खासदार कोल्हेंवर कडवट टीका : सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 17 जुलै 2021

शिरूरमधील वादाचे पडसाद राज्य पातळीवर 

पुणे : पुणे-नाशिक रस्तेमार्गाचे उदघाटन चांगलेच वादात सापडले असून त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये राजकीय कुरघोड्यांचे नाट्य रंगले आहे. (MP Amol Kolhe and Adhalrao fight for credit of Pune-Nashik road) 

या मार्गाच्या श्रेयावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यात पत्रकबाजी या आधीपासून सुरू होती. नारायणगाव येथील बायपासचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उदघाटनावरून दोन्ही नेत्यांत थेटपणे टीकाटिप्पणी सुरू झाली. 

आढळराव यांनी कालच या मार्गाचे उदघाटन करून आपणच हे काम आणले आणि पूर्ण केल्याचा दावा केला. अमोल कोल्हे यांनी आज तेथे जाऊन या कामाची फित कापली. तेथे बोलताना शरद पवार यांच्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाल्याचा टोमणा मारला. तसेच आढळराव यांच्याविषयी बोलताना वयस्कर माणसाने पोरकटपणा करून हसू करून घेऊ नये, अशी टीका केली.

वाचा ही बातमी : वयस्कर माणसाने पोरकटपणाने हसू करून घेऊ नये...

या टिकेची शिवसेनेने दखल घेतली आणि थेट मुख्यालयातूनच या टिकेला उत्तर देणारे पत्रक प्रसिद्धिस दिले. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे बळेबळे खासदार असा अमोल कोल्हे यांचा उल्लेख यात केला आहे. कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत आणि आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवले आहे, असा टोला लगावला आहे.

अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत, असा सवाल विचारला आहे. अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक अशी शंका सेनेने व्यक्त केली आहे. तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधीकधी स्मरणशक्ती विसरतात तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले , आपण ज्या उद्धवसाहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की असे होते.

अहो, कोल्हे ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरू नका.  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार हे सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. तुम्ही कशाला फार विचार करता? तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमतापण! दिग्ददर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पाहा. फार डोके चालवू नका, असा सल्ला देत शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी दिला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख