आमदार अनिल भोसलेंना आणखी एक दणका : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द 
Shivajirao Bhosale Co-operative Bank's license revoked

आमदार अनिल भोसलेंना आणखी एक दणका : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द 

अवसायानानंतर ठेवीदारांना कमाल पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम देण्यात येईल

पुणे  : सुमारे ७१ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले आमदार अनिल भोसले यांना आणखी दणका बसला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी (ता. ३१ मे) जारी केले आहेत. (Shivajirao Bhosale Co-operative Bank's license revoked)

बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार ९८ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम ठेव विमा महामंडळाकडून (डीआयसीजीसी) प्राप्त होईल. दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेने सहकार आयुक्त यांना बॅंकेवर अवसायक नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

शिवाजीराव भोसले सहकारी भोसले बँकेच्या एकूण १४ शाखा असून, ९५ हजार खातेदार आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत पुरेसे भांडवल नसून, या बॅंकेकडून बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या तरतुदींचे पालन करण्यात आले नाही. बँकेला यापुढे बँकिंग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास जनतेच्या हितावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे ‘बँकिंग’ व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे याचा समावेश आहे. 

परवाना रद्द झाल्यामुळे तरलता प्रक्रिया सुरू झाल्यास, ‘डीआयसीजीसी’कडून ठेवीदार-खातेदारांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. अवसायानानंतर ठेवीदारांना कमाल पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम देण्यात येईल, असे रिझर्व्ह बॅंकेच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेबाबत रिझर्व्ह बॅंकेने सहकार आयुक्त अनिल कवडे आणि महाराष्ट्र राज्य अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची टास्क फोर्स समिती नेमली होती. या टास्क फोर्सने बॅंकेचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी शिफारस रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय समितीकडे केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 

बॅंकेतील ७१ कोटी ७८ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी संचालक आमदार अनिल भोसले यांच्यासह १६ पदाधिकाऱ्यांविरुद्ध यापूर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in