शिवसैनिक म्हणतात, 'शिवाजीराव आढळराव यांना विधान परिषदेवर संधी द्या' 

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात तीव्र संघर्ष करत 15 वर्ष खासदार म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. ग्रामीण भागात पक्ष संघटनाही वाढवली आहे. उद्योग, शिक्षण व सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ते राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्याच्या सर्व निकषांत बसतात, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी.
शिवसैनिक म्हणतात, 'शिवाजीराव आढळराव यांना विधान परिषदेवर संधी द्या' 
Shivajirao Adhalrao Give the chance on the Legislative Council

पारगाव (पुणे) : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात (पुणे जिल्हा) तीव्र संघर्ष करत 15 वर्ष खासदार म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. ग्रामीण भागात पक्ष संघटनाही वाढवली आहे.

उद्योग, शिक्षण व सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ते राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्याच्या सर्व निकषांत बसतात, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून आढळराव पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर कटके यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना कटके यांनी ही माहिती दिली.

या वेळी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, सुलभा उबाळे, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, राजाराम बाणखेले, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, माऊली खंडागळे, अरुण गिरे, सचिन बांगर, पोपट शेलार, रामदास धनवटे, शिवाजी वर्पे, अनिल डोके, अजित चव्हाण आदी उपस्थीत होते. 

निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही, त्यामुळे शिवसैनिकांची कामे होत नाहीत. राष्ट्रवादी व कॉंग्रेस बरोबर राज्यात आघाडी असली तरी जिल्हा व तालुका पातळीवर आघाडी धर्म पाळला जात नाही. शिवसेनेचा आवाज जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जिल्ह्यात एखादा दुसरा अपवाद वगळता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत. शिवसेनेची ताकद वाढविणारा व शिवसैनिकांना बळ देणारा खंबीर लोकप्रतिनिधी म्हणून आढळराव पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेले सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून शिवसैनिक आनंदी आहेत. पण पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने जिल्ह्यातील शिवसेनेच्या मतदारांची व शिवसैनिकांची कामे होत नाहीत. त्यांची कुचंबणा होत आहे. 

जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविणारा व शिवसैनिकांना बळ देणारा खंबीर प्रशासक व लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. त्यासाठी माजी खासदार तथा शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती कटके यांनी दिली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in