अजित पवारांच्या उपस्थितीतील मेळाव्यास शिवसेना, कॉंग्रेसला निमंत्रणच नाही  - Shiv Sena and Congress are not invited to the rally in the presence of Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांच्या उपस्थितीतील मेळाव्यास शिवसेना, कॉंग्रेसला निमंत्रणच नाही 

गणेश कोरे 
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

या फ्लेक्‍सवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील छायाचित्र नसल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. 

पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाकडून जोरदारपणे सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि भाजपच्या सर्वच नेत्यांनी मेळावे, बैठकांचा धडाका सुरू केला आहे. 

पिंपरी चिंचवड येथे रविवारी (ता. 22 नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला शिवसेना आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना आमंत्रणच नसल्याचे समोर आले आहे. व्यासपीठावरील फ्लेक्‍सवर केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचीच छायाचित्रे लावण्यात आली होती. यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची धुसफूस कायम असल्याचे चित्र आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील मेळाव्याला मात्र सर्वपक्षीये नेते व्यासपीठावर उपस्थित होते. 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीसह भाजपनेही प्रतिष्ठेची केली आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्रित लढत आहे, तर भाजप स्वतंत्रपणे लढत आहे. महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढत असताना, मात्र पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिवसेनेला विश्‍वासात घेतले जात नसल्याची नाराजी पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. 

पिंपरी चिंचवडचा मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या मेळाव्याला मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मात्र, शिवसेनेला या मेळाव्याचे निमंत्रणच नसल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.

मेळाव्याला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे, भोसरीचे पदाधिकारी सुलभा उबाळे, गौतम चाबुकस्वार हे अनुपस्थित होते. फ्लेक्‍सवर केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची छायाचित्रे होती. या फ्लेक्‍सवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील छायाचित्र नसल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान, सांगली आणि कोल्हापूरला शनिवारी (ता.21 नोव्हेंबर) झालेल्या महाविकास आघाडीचे मेळावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या मेळाव्याला मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, कॉंग्रसेचे मंत्री सतेज पाटील, विश्‍वजित कदम उपस्थित होते. फ्लेक्‍सवर राजू शेट्टी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. 

सांगली आणि कोल्हापूरला जर सर्व पक्षीय नेत्यांना मेळाव्याचे आमंत्रण होते, सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. तर पुणे जिल्ह्यातील मेळाव्याला शिवसेना आणि कॉंग्रेसला का डावलण्यात आले, असा प्रश्‍न शिवसेना आणि कॉंग्रेसच्या गोटातून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतरही पुणे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये धुसफूस सुरु असल्याचे समोर आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख