Shankar Jambhalkar Chairman of Shirur Market Committee | Sarkarnama

पाचुंदकरांचे बंड थंड...पण शंकर जांभळकरांच्या पथ्यावर ! 

भरत पचंगे
सोमवार, 29 जून 2020

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती कोण होणार, याचे भाकित "सरकारनामा'ने एक दिवस आधीच केले होते. त्यानुसार आज (ता. 29 जून) सभापतिपदी शंकर जांभळकर यांची बिनविरोध निवड झाली. 

शिक्रापूर (पुणे) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती कोण होणार, याचे भाकित "सरकारनामा'ने एक दिवस आधीच केले होते. त्यानुसार आज (ता. 29 जून) सभापतिपदी शंकर जांभळकर यांची बिनविरोध निवड झाली. 

'सभापतिपदाचे जांभूळ अशोक पवार कुणाच्या मुखी भरविणार?' अशा मथळ्याचे वृत्त रविवारी (ता. 28) "सरकारनामा'ने प्रसिद्ध केले होते. त्या बातमीने रविवारी दिवसभर संपूर्ण तालुका व शिरूर-हवेली मतदार संघ ढवळून निघाला. शिरूर तालुक्‍याच्या राजकारणात आमदार अशोक पवार यांच्या संमतीने आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाला जांभळकर यांच्या रूपाने मानाचे पान मिळाले आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून शिरूर तालुक्‍याचे राजकारण आणि विशेषत: शिरुर-हवेली व आंबेगाव-शिरुर या दोन्ही मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या दृष्टीने शिरूर बाजार समितीचे सभापतिपद प्रतिष्ठेचे ठरले होते. कारण, तीन वर्षांपूर्वी सभापती-उपसभापती ही दोन्ही पदे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात देण्यात आली होती. त्यामुळे शिरूर-आंबेगाव मधून माजी उपसभापती मानसिंग पाचुंदकर यांनी बंडाची तयारी केली होती. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या तीन संचालकांची फूस होती. मात्र, राजकारणात साम, दाम, दंड भेद या शस्त्रासह बंड करावे लागते. त्यातील कुठल्याच अस्त्राशिवाय लढायला निघालेल्या पाचुंदकरांना आपले बंड थंड करावे लागले. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार पवार या दोघांशी सातत्याने समन्वय राखण्याच्या शंकर जांभळकरांच्या प्रयत्नाला यश येत ते सभापतिपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. 

ब्रेथलेस काव्याचा रचनाकार 

शिरूर तालुक्‍यात सर्वाधिक ऊस उत्पादन करणारे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या करंदी (ता. शिरुर) येथे शंकर जांभळकर यांचे एकटे घर. करंदीचे माजी सरपंच दिलीप ढोकले यांचे ते भाचे. व्यवसायाने आर्किटेक्‍ट, तर "कन्हेरीची फुले' नावाच्या ब्रेथलेस काव्याचे ते रचनाकार. मराठीतील बहुधा पहिले ब्रेथलेस काव्य शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे व प्रख्यात पार्श्वगायिका बेला शेंडे यांना घेऊन त्यांनी 2013 मध्ये "कन्हेरीची फुले' नावाचा अलबम काढला होता. त्या वेळी तो चर्चेतही राहिला. 

पुढे शिरूर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना तिकीट नाकारले गेले. पण, बाजार समितीच्या निवडणुकीत एक नंबरची मते घेत त्यांनी पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेतले. कुणीही गॉडफादर नसताना राजकारणात उच्चशिक्षित माणसं यशस्वी होऊ शकतात, हे दाखवून देणारा प्रतिभावंत तरुण म्हणजेच बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती शंकर जांभळकर. 

अशोक पवारांनी ओळखला पुढील धोका 

शिरूरमध्ये लवकरच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील 39 गावे महत्वाची ठरणार आहेत. या वेळी पदाच्या वाटपात न्याय मिळाला नसता तर शिरुर राष्ट्रवादीमध्ये बेबनाव निर्माण होण्याची शक्‍यता होती. 

माजी सभापती प्रकाश पवार यांना तालुक्‍याच्या राजकारणात दुर्लक्षित केले गेल्याने त्यांचा राग अद्याप कायम आहे. स्वाती पाचुंदकर व सविता बगाटे या दोघींचा जिल्हा परिषद अध्यक्षपदावेळी विचार झाला नाही. त्यामुळे या 39 गावांचे सामूहिक दु:ख आगामी घोडगंगाच्या निवडणुकीत पुढे आले असते. हे ओळखूनच आमदार पवार यांनी सभापतिपदाचे जांभूळ सोमवारच्या मुहूर्तावर शंकर जांभळकरांच्या तोंडी भरविले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख