त्या प्रकरणावर तोडगा काढण्याचा डॉ. नीलम गोऱ्हेंचा आदेश  - settle the matter. Order of Neelam Gorhe | Politics Marathi News - Sarkarnama

त्या प्रकरणावर तोडगा काढण्याचा डॉ. नीलम गोऱ्हेंचा आदेश 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 31 जानेवारी 2021

पद्मश्री जाहीर झालेल्या गिरीश प्रभू्णे यांच्या, संस्थे्ला तीन कोटी रुपयांच्या थकित मिळकत करापोटी मालमत्ता जप्तीची नोटीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने काढल्याबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खंत व्यक्त केली आहे.

पिंपरी : समाजहिताचे आणि समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या आणि नुकतीच पद्मश्री जाहीर झालेल्या गिरीश प्रभू्णे यांच्या, संस्थे्ला तीन कोटी रुपयांच्या थकित मिळकत करापोटी मालमत्ता जप्तीची नोटीस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने काढल्याबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच याप्रकरणी तातडीने तोडगा काढण्याचे लेखी आदेश त्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत.

प्रभूणे अध्यक्ष असलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचालित क्रांतीवीर चापेकर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय व पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थाकडे तीन कोटी रुपयांच्या थकित मिळकतकरापोटी मालमत्ता जप्तीची नोटीस नुकतीच बजावली. त्यामुळे मोठा धुरळा उडाला आहे.

पवना नदीच्या ब्लू लाईन रेषेत (अनधिकृत) चापेकर विद्यालयाची इमारत आहे. त्यामुळे तिच्यावर मूळ मिळकतकर आणि बेकादेशीर बांधकामांना लागणारा शास्तीकर (मूळ मिळकतकराच्या दुप्पट) लागलेला आहे. मात्र, खास बाब म्हणून या विद्यालयाचा विचार करण्याची सुचना डॉ. गोऱ्हे यांनी राज्य सरकारला केली आहे.

तर, शैक्षणिक कार्य असल्याने प्रभुणे यांच्या संस्थेची फाईल शैक्षणिक समितीकडे पाठवून कर कमी करता येईल का याचा विचार करावा, असे त्यांनी आय़ुक्तांना सुचविले आहे. प्रभूणेंच्या संस्थेचे बांधकाम ब्लू लाईनमध्ये (अनधिकृत) असले, तरी शैक्षणिक संस्था म्हणून त्यांचा अधिक सहानुभूतीने विचार व्हावा, असेही त्यांनी आयुक्ताना सांगितले आहे. तर, त्यांचा मूळ कर माफ करण्याविषयी राज्य सरकार सकारात्मक असेल, पण त्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. 

प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर होताच त्यांच्या अभिनंदनासाठी पिंपरी-चिंचवडमधील आमदार,खासदारांसह शहरवासियांची अभिनंदनासाठी रांग लागली होती. शहरवासीयांच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. या पुरस्काराने शहराच्या नावलौकिकात एक वेगळीच भर पडली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती.  

सामाजिक कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रभूणे यांना पद्मश्री जाहीर झाली अन प्रजासत्ताकदिनी त्यांच्या अभिनंदनासाठी शहरातून रांग लागली होती. शिवसेनेचे शहरातील खासदार श्रीरंग बारणे,आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, भाजपचे माजी खासदार अमर साबळे,पालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,उपमहापौर केशव घोळवे,पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक शत्रूघ्न काटे, बाबू नायर, भाजपचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, स्वीकृत नगरसेवक व शहर सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, नगरसेविका शारदा सोनवणे  यांनी प्रभूणेकाकांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. 

त्यानंत प्रभूणे यांच्या संस्थेला तीन कोटी रुपयांच्या थकित मिळकतकरापोटी मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली. त्यामुळे मोठा धुरळा उडाला आहे. 

 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख