सरपंचाच्या विजयी मिरवणुकीत चक्क नोटांची उधळण ! 

चौकातून गावातील महालक्ष्मी मंदिरापर्यंत डीजेच्या दणदणाटात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
सरपंचाच्या विजयी मिरवणुकीत चक्क नोटांची उधळण ! 
Scattering of notes in Sarpanch's victory procession in Khed taluka

दावडी (जि. पुणे) : गावगाड्याचा कारभार आणि तेथील कारभारी ह्यांची निवड हा अनेकांना धक्के देणारा असतो. या निवडणुका त्वेषाने लढल्या जातात आणि जिंकल्यानंतरही त्याच पद्धतीने विजयी मिरवणुकाही काढल्या जातात. सध्या जेसीबीतून गुलाल उधळण्याची आणि क्रेनच्या साहाय्याने हार घालण्याची प्रथा रुढ होऊ पाहत आहे. याबरोबरच खेड तालुक्‍यातील दावडी येथील सरपंच आणि उपसरपंच निवडीनंतर एका उत्साही कार्यकर्त्याने चक्क नोटांची उधळण करत जल्लोष केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

आरक्षणाच्या प्रश्‍नावरून काही ग्रामपंचायती कोर्टात गेल्या होत्या. त्यामुळे खेड तालुक्‍यातील सरपंच आणि उपसरपंच निवडी विलंबाने झाल्या आहेत. त्यानुसार दावडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाची बुधवारी (ता. 24 फेब्रुवारी) निवडणूक झाली. त्यानुसार निवडणुकीत सरपंचपदासाठी संभाजी घारे यांची, तर उपसरपंचपदी राहुल कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला. 

त्यानंतर सरपंच आणि उपसरपंचांची सत्ताधारी पॅनेलच्या लोकांनी गावातून मिरवणूक काढण्याचा कार्यक्रम आखला होता. पण मिरवणुकीपूर्वी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी भलामोठा हार आणून तो क्रेनच्या साहाय्याने सरपंच आणि उपसरपंचांना घालण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार तो मोठा हार क्रेनच्या मदतीने नव्या पदाधिकाऱ्यांना घालण्यात आला. त्यानंतर मात्र एका उत्साही कार्यकर्त्याने खिशातून नोटांचे बंडल बाहेर काढले आणि मिरवणुकीत चक्क नोटांची उधळण करण्यात आली. 

नूतन सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांना जेसीबी मशिनच्या बकेटमध्ये बसवून फोटोसेशन करण्यात आले. या वेळी कित्येक पोती गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर चौकातून गावातील महालक्ष्मी मंदिरापर्यंत डीजेच्या दणदणाटात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. दावडी गावातील या मिरवणुकीचे, नोटा उधळण्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्ह्यात पुण्याचा समावेश आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून पुणे जिल्हा प्रशासनाने सर्व धार्मिक कार्यक्रम (यात्रा, जत्रा) रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांसह सर्व प्रशासन वारंवार करत आहे. मात्र, दावडी येथील सरपंच आणि उपसरपंचांच्या निवडीनंतर निघालेल्या मिरवणुकीत सुमारे एक हजार कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते. परवानगी नसतानाही या मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात आला होता. निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलिस उपस्थित होते. त्यानंतर मिरवणुकीच्या वेळीच पोलिस कसे काय निघून गेले? असा प्रश्‍न सध्या विचारला जात आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in