नव्या वर्षात भाजपतून राष्ट्रवादीत इनकमिंग; संतोष बारणे 5 जानेवारीला प्रवेश करणार  - Santosh Barne of Pimpri Chinchwad will join NCP on January 5 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

नव्या वर्षात भाजपतून राष्ट्रवादीत इनकमिंग; संतोष बारणे 5 जानेवारीला प्रवेश करणार 

उत्तम कुटे 
रविवार, 27 डिसेंबर 2020

बहुतांश नगरसेवक हे शहराचे भाजपचे कारभारी आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत.

पिंपरी : नवीन वर्षात पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमधून आऊटगोईंग, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग अशी राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्याची सुरुवात नवीन वर्षाच्या प्रारंभीच महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे हे समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेशाने करणार आहेत. त्यांनीच "सरकारनामा'ला ही माहिती आज (ता. 27 डिसेंबर) दिली. 

संतोष बारणे हे माजी विरोधी पक्षनेते असले तरी त्यांच्या पत्नी माया बारणे या भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका आहेत, त्यामुळे बारणे यांच्या प्रवेशाला महत्त्व आहे. 

गत पालिका निवडणुकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आऊटगोईंग झाले होते. त्यामुळे महापालिकेत सत्तांतर होऊन 2017 मध्ये भाजप प्रथमच पालिकेत सत्तेत आला होता. आता 2022 च्या आगामी पालिका निवडणुकीला नेमके 2017 च्या उलट होण्याचे संकेत आतापासूनच सुरू झालेल्या जोरदार राजकीय हालचालीतून मिळाले आहेत. 

भाजपमध्ये गेलेल्यांपैकी अनेक नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत, त्याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. टर्म पूर्ण होताच पक्षांतर करणार असल्याचे एका नगरसेवकाने सांगितले. परत येणारे अनेकजण कामे होत नसल्याने नाराज आहेत. काहींना अजितदादा यांच्याबरोबर पुन्हा काम करायचे आहे. बारणे यांनी हेच कारण सांगितले आहे. पक्षांतराच्या तयारीत असलेले बहुतांश नगरसेवक हे शहराचे भाजपचे कारभारी आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. हे दोघेही आमदार राष्ट्रवादीतूनच भाजपात गेलेले आहेत. 

दरम्यान, पुण्यात शनिवारी (ता. 26 डिसेंबर) अजितदादांची संतोष बारणे, बिनविरोध निवडून आलेले भोसरीतील भाजपचे नगरसेवक रवी लांडगे आणि पालिकेतील अपक्ष नगरसेवकांचे गटनेते कैलास बारणे यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यानंतर अजितदादांनीच पक्षातील इनकमिंगवर भाष्य केले होते. संतोष बारणे यांनी आपण नवीन वर्षात 5 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे आज सांगितले. तर, यापूर्वीही दादांना शहरातील प्रश्नी अनेकदा भेटलो असल्याचे अपक्षांचे नेते असलेल्या कैलास बारणे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख