पुणे परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राजेंद्र जगताप 

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी पुणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची आज (ता. २४ जुलै) नियुक्ती करण्यात आली.
पुणे परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राजेंद्र जगताप 
Rajendra Jagtap as Managing Director of Pune Transport Corporation

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी पुणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांची आज (ता. २४ जुलै) नियुक्ती करण्यात आली. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकरी व आधिकाऱ्यांच्या समन्वयातून पीएमपीएमएलची अधिक चांगली सेवा देण्याबरोबरच ही संस्था अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी भावना जगताप यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केली. 

जगताप यांनी पदाची सूत्रे शुक्रवारी (ता. २४ जुलै) दुपारी घेतली. त्यानंतर ‘सरकारनामा’शी बोलताना त्यांनी पुणेकरांसाठी अधिक चांगली वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘पीएमपीएमएल ही स्वतंत्र कंपनी असली तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका या कंपनीच्या मोठ्या महत्वाच्या घटक आहेत. या दोन्ही महापालिकांच्या क्षेत्रात राहणारी सुमारे साठ लाख लोकसंख्या तसेच दोन्ही शहरांच्या शेजारी असलेल्या ग्रामीण भागात ‘पीएमपीएमएल’ची सेवा पुरविली जाते. नजीकच्या काळात ही सेवा अधिक सक्षम करण्यास प्राधान्य राहील. ’’ 

वाहतूक कोंडी हा पुणेकरांसाठी मोठा प्रश्‍न असून दोन्ही महापालिकांच्या मदतीने आणि सहकार्याने पुण्याची वाहतूक समस्या अधिक चांगल्या पद्धतीने सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले. 

पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा संचालक या पदावर या पूर्वी तुकाराम मुंढे यांनी काम केले आहे. मुंडे यांच्या काळात तोट्यातील पीएमपी त्यांनी काही महिन्यांतच नफ्यात आणली होती. मात्र, अल्पावधीतच त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर नयना गुंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबरोबरच वाहतूक सेवेत गुणवत्ता सुधारणा करणे, याबरोबरच ठेकेदारीवर चालणाऱ्या बसेसला शिस्त लावावी लागणार आहे. पुण्यात गर्दीच्या आणि दाट लोकवस्तीचा रस्त्यांवर छोट्या स्वरूपातील बस आणून त्यांना नवा प्रयोग करावा लागणार आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या बाहेर ग्रामीण भागात वाहतूक करणाऱ्या बस मार्गांची पुर्नरचना आणि त्यातून उत्पन्नवाढीच्या मार्गावर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच दोन्ही महापालिकांमध्ये समन्वय राखण्याचे मोठे आव्हान राजेंद्र जगताप यांच्यासमोर असणार आहे. पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून जगताप यांची कुठेच नियुक्ती झाली नव्हती. कोरानो विषाणूच्या संकट काळातही सरकारने त्यांना कुठेही नियुक्ती दिलेली नव्हती. 

Edited By Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in