पुणेकर जावडेकर पिंपरीत आले, पण बोलले हिंदी...! - Punekar Javadekar came to Pimpri, but spoke Hindi | Politics Marathi News - Sarkarnama

पुणेकर जावडेकर पिंपरीत आले, पण बोलले हिंदी...!

उत्तम कुटे 
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

सोशल मिडियात टुलकिटव्दारे भारताला बदनाम करण्याची योजना आंतरराष्ट्रीय पातळीवर आखण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५५ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचे उदघाटन केल्यानंतर जावेडकर बोलत होते.

पिंपरी : सोशल मिडियात टुलकिटव्दारे भारताला बदनाम करण्याची योजना आंतरराष्ट्रीय पातळीवर आखण्यात आली आहे. पण, भारत शक्तीशाली देश असल्यामुळे काही फरक पडणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती, प्रसारण आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये केले. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी सोशल मिडियातून दिलेला पाठिंबा व त्यावरून देशात सध्या सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जावडेकरांनी हे विधान केल्याने त्याला महत्व आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५५ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचे उदघाटन केल्यानंतर जावेडकर बोलत होते. राज्य पातळीवरील हे अधिवेशन असूनही पुणेकर जावडेकरांनी आपले भाषण हिंदीतून केले. कोरोनामुळे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारीच यावेळच्या अधिवेशनाला उपस्थित होते. 

यावेळी जावडेकर म्हणाले, सोशल मिडिया हे तरुणाईला चॅलेंज असल्याचे जावडेकर म्हणाले. तरुणाईमुळेच देश निश्चीत आणखी पुढे जाणार आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश ओडीएफ (उघड्यावर शौचास जाण्यापासून) मुक्त झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पूर्वीच्या आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली सत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी कुठे आणि आम्ही त्यांच्या सशक्तीकरणाकरिता दिलेले सात लाख कोटी रुपये कुठे असे सांगत या दोन्हींची तुलनाच होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

जयप्रकाश नारायण यांना पुणे विद्यापीठाने डीलिट पदवी देण्यास नकार दिल्यानंतर विद्यार्थ्यांनीच ती त्यांना त्यावेळी कशी दिली ते आणीबाणीतील १६ महिने तुरुंगवास आदी १९७० ते १९८० या काळातील अभाविपच्या आपल्या आठवणींना जावडेकर यांनी यावेळी पुन्हा एकवार उजाळा दिला. 

आणीबाणीत माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या आंदोलनाचा धागा पकडीत सध्याच्या मिडियाचे कान टोचण्यास ते विसरले नाहीत. माध्यमांचे स्वातंत्र्य राहणारच असल्याचे एकीकडे स्पष्ट करताना, पण माध्यम स्वातंत्र्य म्हणजे अफवा पसरवणे नाही, हे त्यांनी निक्षून सांगितले. त्याचे उदाहरण देताना ते म्हणाले, दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ट्रॅक्टर पलटी होऊन त्यात एका शेतकऱ्याला मृत्यू झाला. पण, प्रसिद्धी माध्यमांनी त्याचा मृत्यू हा पोलिस गोळीबारात झाल्याच्या बातम्या रंगवल्या. हे माध्यम स्वातंत्र्य नाही. खोटं पसरवण हे माध्यम स्वातंत्र्य नाही. टिका करा, तिचे स्वागत आहे, पण खोटं पसरवू नका, असे सांगत त्यांनी पसार माध्यमांचे कान टोचले. 

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख