पुणे : गुंड गजा मारणेच्या सुटेनंतर निघालेल्या मिरवणुकीवरुन पोलिसांवर जोरदार टीका झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांचे कान टोचल्यानंतर अखेर पुणे पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी पाऊल उचलले. पोलिसांकडून होणाऱ्या अटकेच्या कारवाईच्या भितीपोटी मारणे व त्याचे साथीदार फरारी झाले आहेत. तर दुसरीकडे पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी, घरझडत्यांबरोबरच तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला जात आहे.
तळोजा कारागृहातुन सुटल्यानंतर मारणेची तळोजा ते पुण्यापर्यंत शेकडो वाहनांच्या गर्दीत जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करून गुंडांकडून वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात झाली. मिरवणुकीदरम्यान, मारणे व त्याच्या साथीदारांकडून कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे प्रारंभी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मारणेविरुद्ध पहिला गुन्हा दाखल केला. त्यानंतर कोथरुड पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, मिरवणुकीचे व्हिडीओ सोशल मिडीयामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांवर जोरदार टीका करण्यात आली, तर शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत "कारागृहातुन सुटलेल्या गुंडाची मिरवणूक निघणे ही समाजस्वास्थासाठी चांगली बाब नाही' अशा शब्दात पोलिसांचे कान टोचले.
ही पण बातमी वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्याची दोन कोटींची गाडी जप्त
पोलिसांकडून गुंडांचा रात्रं-दिवस शोध
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्याकडूनही मारणेच्या मिरवणुकीची गांभीर्याने दखल घेऊन कारवाईला सुरूवात करण्यात आली. त्यामध्ये गजा मारणेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, गैरकायद्याची मंडळी एकत्रीत करून दहशत निर्माण करणे, कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन करणे असे, गुन्हे दाखल करीत काही जणांना अटक केली. त्याचबरोबर मारणेच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या अलिशान वाहनांसह अन्य वाहने ताब्यात घेण्याच्या कारवाईला सुरूवात करण्यात आली होती.
दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या टिकेनंतर शुक्रवारपासून वारजे व कोथरुड पोलिसांकडून गजा मारणे व त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी शोधमोहिम सुरु केली. त्यामुळे मारणे व त्याचे साथीदार फरारी झाले आहेत. पोलिसांकडून आरोपी जेथे लपून बसले असतील, अशा संशयित ठिकाणी रात्री-अपरात्री छापेमारी, आरोपींच्या घरझडत्या करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेतला जाऊ लागला आहे.
आश्रय देणारे, मदत करणाऱ्यांवर होणार कारवाई, आरोपींच्या मालमत्ताही होणार जप्त
संबंधित आरोपींना आश्रय देणारे, त्यांना मदत करणाऱ्यांचीही पोलिसांकडून माहिती काढली जात असून त्यांच्यावरही पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. आरोपींच्या जंगम, स्थावर मालमत्ता, बॅंक खात्याची माहिती घेणे सुरू आहे. आरोपी मिळून न आल्यास त्यांच्या मालमत्ता पोलिसांकडून जप्त केल्या जाणार आहेत.

