नवनिर्वाचित आमदारांकडे पदवीधरांनी मांडले गाऱ्हाणे.. - Pune Graduate Constituency MLA Arun Lad interacts with voters | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

नवनिर्वाचित आमदारांकडे पदवीधरांनी मांडले गाऱ्हाणे..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 जानेवारी 2021

भाजपने आतापर्यंत दूर्लक्ष केल्याचा परिपाक म्हणून मतदारांनी मला निवडून दिल्याचे यावेळी लाड म्हणाले.

पिंपरी : सर्व पदवीधरांच्या प्रश्नांसाठी मी अविरत प्रयत्नशील राहून त्यांना न्याय देणार असल्याची ग्वाही पुणे पदवीधरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांनी काल पिंपरी-चिंचवडमध्ये दिली. पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील आघाडीतील तिन्ही पक्षांचे आमदार, खासदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या सोबत पदवीधर मतदारांच्याही दिवसभर प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांनी आपल्या विजयाबद्दल त्यांचे आभार मानले. 

पुणे पदवीधरमधील अनेक प्रश्नांकडे हा मतदारसंघ असलेल्या भाजपने आतापर्यंत दूर्लक्ष केल्याचा परिपाक म्हणून सुज्ञ मतदारांनी मला निवडून दिल्याचे यावेळी लाड म्हणाले. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी आपल्या या पहिल्याच आभार दौऱ्यात दिली.

पदवीधरांच्या जोडीने शेतकरी, डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपापल्या अडचणी यावेळी त्यांना सांगितल्या. शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी यावेळी त्यांच्याकडे तरुण शेतकऱ्यांनी केली. तर, होमिओपॅथिक डॉक्टरांनी अभ्यासक्रमाबद्दलच्या अडचणी त्यांना सांगितल्या. एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत त्यांचे निवारण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

पिंपरी-चिंचवडमध्ये लाड यांनी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भोसरीचे आमदार विलास लांडे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर या आघाडीचे नेते व पदाधिकाऱ्यांसह पदवीधरांच्याही भेटी घेऊन त्यांचे आभार मानले. 

यापूर्वी पुण्यात ते उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते अजित पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती,नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष आमदार चेतन तुपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार सुनील टिंगरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, अंकुश काकडे, दीपक मानकर, सचिन दोडके, स्वाती पोकळे, सोपान चव्हाण, नितीन कदम, प्रशांत जगताप, आनंद सवाने, शिवसेनेचे शाम देशपांडे, काँग्रेसचे दत्ता भैरट, अभय छाजेड, आबा बागुल, उल्हास पवार यांना भेटले. पतंगराव कदम यांचे बंधू स्वर्गीय आत्माराम कदम यांच्या बावधन येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. एक दृष्टा, तत्वनिष्ठ व्यक्ती आपल्यातून हरपल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख