गुड न्यूज : पुणे जिल्ह्यातील या 21 कार्यालयांत दस्त नोंदणी 18 मे पासून

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड या शहरांतील कार्यालये बंदच राहणार
uddhav-and-sharad-pawar-
uddhav-and-sharad-pawar-

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात असलेल्या भागात दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये आणि विशेष विवाह कार्यालये पुरेशी खबरदारी घेऊन 18 मे पासून सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालये बंदच राहणार आहेत.

ही कार्यालये कार्यान्वित करताना कामकाजादरम्यान कर्मचारी आणि नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. सहजिल्हा निबंधक, पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली सर्व 21 कार्यालये दस्त नोंदणीसाठी 18 मे पासून (सद्यस्थितीत घोषित करण्यात आलेले प्रतिबंधित क्षेत्र व भविष्यात घोषित होणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये तो घोषित कालावधी वगळून) सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
----
जिल्ह्यात सुरू होणारी दुय्यम निबंधक कार्यालये : 
जिल्ह्यात बारामती तालुक्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, कार्यालय बारामती क्रमांक-1 सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय बारामती क्रमांक-2, शिरुर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय शिरुर व तळेगाव ढमढेरे, दौंड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय दौंड व केडगाव, भोर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय भोर, वेल्हा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय वेल्हा, इंदापूर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय इंदापूर, जुन्नर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय जुन्नर व नारायणगाव, आंबेगाव तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय आंबेगाव, पुरंदर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय पुरदंर, मुळशी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी 1 (पौड) व मुळशी 2 (हिंजवडी), मावळ तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे व लोणावळा, खेड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय, खेड 1 (खेड), खेड 2 (चाकण), खेड 3 (खेड).

मुख्यमंत्री व शरद पवारांनी घेतला आढावा

मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला.

यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. १७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र राज्याला ज्या महत्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. 

गेल्या सुमारे ५५ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात  ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता  आणून उद्योग- व्यवसायांना सुरु करण्यात आले होते. ६५ हजार उद्योगांना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून ३५ हजार उद्योग सुरु झाले आहेत तसेच ९ लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले.

परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु असून पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु आहे.उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर ५० टक्के पर्यंत वाढला गेला आहे. तसेच परार्ज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला आहे अशी माहितीही देण्यात आली. 

आरोग्य व्यवस्थेचा आढावा, वैद्यकीय उपकरणांची गरज तसेच रिक्त पदे भरणे यावरही चर्चा झाली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन्स, कंटेनमेंट झोन्समध्ये बंधने कशा रीतीने पाळायची यावरही चर्चा झाली.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य सरकारने कशी वेगाने पाउले उचलली तसेच त्याचे सकारात्मक परिणाम काय दिसले ते सांगितले. जिल्ह्यांच्या सीमा न उघडता मर्यादित स्वरूपात आणि पुरेशी काळजी घेऊनच पुढील नियोजन करावे लागेल असे त्यांनी सांगितले. संकट अजून टळलेले नाही. डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची मदत आपण घेतो आहोत अशीही माहिती त्यांनी दिली.  

लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगासंमोर आव्हान उभे ठाकले आहे. याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली. केंद्र सरकारने जे पॅकेज दिले आहे त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायची तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे वैद्यकीय संकट कसे रोखायचे व दुसरीकडे आर्थिक आघाडीवर ठामपणे कसे उभे राहायचे यासाठी तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालावरही चर्चा झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com