चाकण : म्हाळुंगे (ता. खेड) पोलिस चौकीत दाखल झालेल्या चौकशी अर्जातील तक्रारदाराकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षकला अटक करण्यात आली आहे.
राहुल शालिग्राम भदाणे (वय 32) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसेवक म्हणून काम करताना पैसे देणे घेणे संबंधावरून महाळुंगे पोलिस चौकीत चौकशीसाठी अर्ज दाखल झालेला आहे. त्यातील तक्रारदारावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक भदाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची माहिती दिली होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक ज्योती पाटील करत आहेत.

