तो शब्द खरा करूनच अजित पवार येणार पुन्हा मते मागायला!  - Provision made by Ajit Pawar in the budget for Laakdi-Nimbodi scheme in Indapur taluka | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

तो शब्द खरा करूनच अजित पवार येणार पुन्हा मते मागायला! 

विनायक चांदगुडे 
मंगळवार, 9 मार्च 2021

या तरतुदीमुळे विरोधकांची राजकीय वाट अधिक खडतर होणार  आहे.

शेटफळगढे (जि. पुणे) : "आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी इंदापुरात लाकडी-निंबोडी योजनेचे पाणी आणू आणि मगच विधानसभेला मते मागायला येऊ,' अशी भीमगर्जना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 6 फेब्रुवारी रोजी इंदापूर येथे झालेल्या मेळाव्यात केली होती. अर्थसंकल्पात या योजनेसाठी निधीची तरतूद करून ती गर्जना प्रत्यक्षात आणण्यासाठीचे पहिले पाऊल अजितदादांनी टाकले आहे. 

लाकडी-निंबोडी योजनेसाठी झालेल्या या तरतुदीमुळे विरोधकांची राजकीय वाट अधिक खडतर होणार असून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व खासदार सुप्रिया सुळे यांची मताच्या बेरजेची वाट अधिक सुकर होणार आहे. सन 1995 पासूनच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ही योजना चर्चेला यायची. मात्र, या योजनेला मूर्त स्वरूप मिळालेले नव्हते.

ही योजना 2007 व 2008 अशा दोन वेळा प्रशासकीय मान्यतेसाठी सरकारकडे पाठवण्यात आली होती. परंतु त्याला प्रशासकीय मान्यता मिळू शकली नव्हती. मात्र, अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्याची घोषणा केल्याने अजित पवार यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची राजकीय चर्चा इंदापूर तालुक्‍यात रंगू लागली आहे. 

या निधीच्या तरतुदीमुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व खासदार सुप्रिया सुळे यांची या मतदारसंघातील मतांच्या बेरजेची पकड अधिक घट्ट होणार आहे. पवार यांनी इंदापूर येथील मेळाव्यात भरणे यांचे मताधिक्‍य 3 वरून 30 हजारांच्या पुढे आणा, असे देखील आवाहन केले होते. त्यामुळे या मताधिक्‍यात वाढ करण्यासाठी पवार यांनी भरणे यांच्या आग्रहावरून इंदापूर तालुक्‍यातील शेती सिंचनाच्या विविध योजनांसाठी 8 मार्च रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. मताधिक्‍य वाढीसाठी ही तरतूद निश्‍चितच उपयोगी ठरणार आहे. 

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीपर्यंत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कॉंग्रेसमध्ये होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी असल्याने 2004, 2009, 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांच्या समर्थक मतांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना फायदा होत होता.

मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीला पाटील यांच्या मताची उणीव भरून काढण्यासाठीही या लाकडी-निंबोडी योजनेसह तालुक्‍यातील इतर सिंचनाच्या योजनांच्या निधीसाठी केलेल्या तरतुदीचा उपयोग होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख