आगामी सव्वा वर्षात दत्तात्रेय भरणे - हर्षवर्धन पाटील यांचा घाम निघणार?  - The power struggle between Harshvardhan Patil and Dattatreya Bharane will increase | Politics Marathi News - Sarkarnama

आगामी सव्वा वर्षात दत्तात्रेय भरणे - हर्षवर्धन पाटील यांचा घाम निघणार? 

विनायक चांदगुडे 
शनिवार, 26 डिसेंबर 2020

आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा इंदापुरात पुन्हा पणाला लागणार आहे. 

शेटफळगढे : कोरोना महामारीमुळे स्थगित झालेल्या निवडणुकांना आता ग्रामपंचायतींच्या रणसंग्रामामुळे सुरुवात झाली आहे. आगामी सव्वा वर्षात इंदापूर तालुक्‍यात ग्रामपंचायत, विकास सोसायट्या, कर्मयोगी व छत्रपती साखर कारखाना, जिल्हा बॅंक, बाजार समिती, इंदापूर नगपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. 

या निवडणुकांच्या निमित्ताने राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष आता पुन्हा तीव्र होणार आहे. तसेच, या सव्वा वर्षातील निवडणुकांच्या फिव्हरच्या निमित्ताने या दोन आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा इंदापुरात पुन्हा पणाला लागणार आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीपासून सुरुवात 

येत्या 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होत असलेल्या तालुक्‍यातील जवळपास 60 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या निमिताने याची सुरुवात होणार आहे. विकास कामांना निधी देण्यासाठी व या कामांची भूमिपूजने आणि उद्‌घाटने हक्काने करण्यासाठी आपल्याच विचाराच्या व्यक्तींच्या ताब्यात ग्रामपंचायतीची सत्ता असावी. यासाठी या दोन्ही नेत्यांनी या निवडणुकांमध्ये लक्ष घातले आहे. यानंतर होणाऱ्या विकास सोसायट्याच्या निवडणुकातही अशीच परिस्थिती राहणार आहे. 

कर्मयोगी, छत्रपती कारखान्यासाठी चुरस 

तालुक्‍यातील कर्मयोगी व छत्रपती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. कोरोनामुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, आता याही निवडणुकांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे कर्मयोगी कारखान्याच्या आगामी निवडणुकीत पाटील यांच्या पॅनेलच्या विरोधात भरणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पॅनेल उतरविणार का? या कडे सभासदाचे लक्ष लागले आहे. छत्रपतीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व भरणे यांच्या पॅनेलच्या विरोधात पाटील भाजपचा पॅनेल उतरविणार का? याकडे सभासदाचे लक्ष लागले आहे. तसे झाल्यास या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. 

भरणे हे जगदाळेंच्या विरोधात उभे राहणार का? 

या दोन्ही कारखान्याच्या निवडणुकीनंतर जिल्हा बॅंकेची निवडणूक होणार आहे. यात विकास सोसायट्याच्या "अ' वगार्तून अप्पासाहेब जगदाळे सध्या जिल्हा बॅंकेवर तालुक्‍यातून प्रतिनिधित्व करीत आहेत. सध्या जगदाळे हे पाटील यांच्या गटात आहेत. त्यामुळे जगदाळे यांच्या विरोधात भरणे अ वगार्तून विकास सोसायटी प्रवगार्तून निवडणूक लढविणार की? कृषी पणन प्रक्रिया मतदारसंघातून? जिल्हा बॅंकेसाठी उभे राहणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. जगदाळे यांच्या विरोधात भरणे उभे न राहिल्यास त्यांच्या विरोधात कोण लढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

बाजार समितीवरही लक्ष 

इंदापूर बाजार समितीचीही निवडणूक होणार आहे. गतवेळी जगदाळे व भरणे यांनी एकत्रित निवडणूक लढवत माजी मंत्री पाटील यांच्या पॅनेलचा पराभव केला होता. आता पाटील व जगदाळे एकत्र आहेत. त्यामुळे भरणे बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनेल उतरवणार का? याकडे तालुक्‍याचे लक्ष आहे. फेब्रुवारी 2022 अखेर इंदापूर नगरपालिका व पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. सध्या नगपालिका व पंचायत समिती ही हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या आपल्या पक्षाच्या ताब्यात घेण्यासाठी मंत्री भरणे किती ताकद पणाला लावणार का? माजी मंत्री पाटील पुन्हा एकदा सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळविणार? याकडेही लक्ष असणार आहे. 

कार्यकर्त्यांना येणार महत्त्व 

अर्थात, या दोन्ही आजी-माजी मंत्र्यांना कार्यकर्त्यांच्या आधारावर राजकीय संघर्ष करावा लागणार आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. त्यामुळे तालुक्‍यात एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकामुळे आगामी सव्वा वर्ष राजकीय फिवर कायम राहणार आहे आणि गावोगावच्या कार्यकर्त्यांनादेखील महत्त्व येणार आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख