"हायस्पीड ट्रेन'चा श्रेयवाद महाआघाडीस पटरी सोडायला लावणार? 

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतर आजी-माजी खासदारांमध्ये तू तू-मैं मैं सुरू झाली आहे. आता हा श्रेयवाद शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस असा होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
"हायस्पीड ट्रेन'चा श्रेयवाद महाआघाडीस पटरी सोडायला लावणार? 
Politics with the approval of Pune-Nashik railway project

शिक्रापूर : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतर आजी-माजी खासदारांमध्ये तू तू-मैं मैं सुरू झाली आहे. आता हा श्रेयवाद शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस असा होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 

या प्रकल्पासाठी आवश्‍यक खर्चास राज्य सरकारने मंजुरी द्यावी; म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना गळ घातली. तर रेल्वे बोर्डाचे मंजुरीपत्र मिळताच माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी अर्थमंत्री अजित पवारांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती देऊन तत्काळ राज्य सरकारला या प्रकल्पासाठी पुढाकार घेवून 3208 कोटींच्या आवश्‍यक खर्चास मंजुरी देण्याची विनंती केली आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघातील श्रेयवादाची ही "हायस्पीड ट्रेन' शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीस सुसाट पुढे नेणार की रुळावर खाली घसरण्यास भाग पाडणार याबाबत पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यामध्ये या हायस्पीड रेल्वेच्या मंजुरीवरून श्रेयवाद सुरू झाला आहे. तसा तो त्यांच्या समर्थकांच्या जुगलबंदीने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. खासदार डॉ. कोल्हे समर्थकांनी काल पुण्यात झालेल्या एका शासकीय बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या वाट्याच्या खर्चास मंजुरी देण्याची विनंती केली. तशी ती आढळराव पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून खर्चास मंजुरीची विनंती केली. आढळराव यांनी शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना सांगून मुख्यमंत्र्यांना फोन करून वैयक्तिक लक्ष घालण्याचे साकडे घातले. 

या सर्वांच्या प्रयत्नांमुळे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पास राज्य सरकारकडून मंजुरी मिळेल. मात्र प्रश्न असा आहे की, इकडे आढळराव-कोल्हे समर्थकांचा रंगलेला श्रेयवाद राज्यपातळीवर पोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीच्या राजकारणातही या श्रेयवादाची इंट्री झाल्यास नवल वाटायला नको. 

सोशल मीडियात रंगले युद्ध 

"कोरोनाचे तीन महिने तुम्ही बाहेरच पडला नाहीत, इतर वेळी मतदार संघात तुम्ही दिसत नाही. संसदेत 370 कलमांवरील चर्चेचे वेळी गैरहजर राहिलात, त्याचाही खुलासा तुम्ही दिलेला नाही. वर्षभरात केंद्राच्या पातळीवर असे काय केले, ते तुम्ही जाहीर करा,' असे म्हणत आढळराव समर्थकांनी खासदार कोल्हे यांना ट्रोल केले. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे भाजपचे श्रेय असल्याचे सांगितल्याने पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेने शनिवारी दिवसभर सोशल मीडियात अक्षरशः धुमाकूळ घातला. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in