आईला भेटायला गेलेला पोलिस कर्मचारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह  - The policeman who went to visit the mother went out to be corona positive | Politics Marathi News - Sarkarnama

आईला भेटायला गेलेला पोलिस कर्मचारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 24 मे 2020

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसदेव (ता. इंदापूर) गावातील 9 व्यक्तींचे संपूर्ण कुटुंब तसेच त्यांच्या शेजारी राहणारे दोघे असे एकूण 11 व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे उघड झाले.

इंदापूर ः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसदेव (ता. इंदापूर) गावातील 9 व्यक्तींचे संपूर्ण कुटुंब तसेच त्यांच्या शेजारी राहणारे दोघे असे एकूण 11 व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे उघड झाले. त्यामुळे इंदापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. 

पुणे पोलिस दलातील एक कर्मचारी 15 मे रोजी दोन दिवसांची सुटी काढून आईला भेटण्यासाठी मूळगावी पळसदेव येथे आला होता. या कालावधीत तो सराफवाडी, भावडी येथील आपल्या नातेवाइकांना भेटला असल्याचे समजते.

दोन दिवस घरी थांबल्यानंतर 18 मे रोजी पहाटे तो पुन्हा पुणे मुख्यालयात हजर झाला. मात्र, अचानक तब्येत बिघडल्याने त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्या पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे इंदापूरकरांची चिंता वाढली आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील पोंदकुलवाडी परिसरात शुक्रवारी (ता. 22) दोन कोरोना रुग्ण आढळून आले होते. मुंबईहून आलेल्या मायलेकरांना कोरोना लागण झाल्याने त्यांच्यावर इंदापूरमधील डॉ. कदम गुरुकुल या ठिकाणी उपचार सुरू आहेत. हे दोन्ही रुग्ण परिसरातील जवळपास अकरा नागरिकांच्या संपर्कात आले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या अकरा नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले असतानाच पळसदेवमधील ही घटना उघडकीस आली आहे. या अकरा जणांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निष्कर्ष निघेल. मात्र या सर्व कुटुंबांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. 

महिती लपवल्याने तिघांवर गुन्हा 

रेड झोन असलेले मुंबई, पुणे येथून मोठ्या संख्येने नागरिक तालुक्‍यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे. रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनास न कळविणाऱ्या नागरिकावर शासकीय नियमानुसार गुन्हे दाखल करण्याच्या सूचना राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शुक्रवारी (ता.22) दिली होती. त्यानुसार आतापर्यंत तीन जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आता पळसदेव प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इंदापुरात येणाऱ्यांची चाचणी करा 

ज्या "रेड झोन'मधून नागरिक इंदापुरात येतील, तेथून त्यांना कोरोना नसल्याचे तसेच इंदापुरात आलेल्या सर्वांची कोविड चाचणी झाल्याशिवाय त्यांना तालुक्‍यात प्रवेश देऊ नये. हा प्रवेश लपविणाऱ्या गावच्या संबंधित प्रशासकीय जबाबदार व्यक्तींवरदेखील गुन्हे दाखल केले; तरच कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख