पिंपरीत अवैध धंद्यांसाठी 'ऑनलाईन' पळवाट  - Police took action on illegeal trade in pimpari chinchwad | Politics Marathi News - Sarkarnama

पिंपरीत अवैध धंद्यांसाठी 'ऑनलाईन' पळवाट 

उत्तम कुटे
सोमवार, 25 जानेवारी 2021

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे बेकायदेशीर धंदेवाल्यानी पिंपरी-चिंचवड शहरातून आपला गाशा गुंडाळण्यास सुरवात केली आहे.

पिंपरी : पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे बेकायदेशीर धंदेवाल्यानी पिंपरी-चिंचवड शहरातून आपला गाशा गुंडाळण्यास सुरवात केली आहे. तर, काहींनी आपले ऑफलाईन धंदे आता ऑनलाईन केल्याचे समोर आले आहे. अशाच एका ऑनलाईन मटका घेणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

कृष्णप्रकाश यांनी गेल्या तीन महिन्यांत बेकायदेशीर धंद्यावर हातोडा मारला आहे. त्याला हातभार लावणाऱ्या पोलिसांवरही त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे शहरातून मटका, जुगार, हातभट्टीचे प्रमाण खूप खाली आले आहे. काही अवैध धंदेवाल्य़ांनी शहरातून बाहेर बस्तान बसवण्यास सुरवात केली आहे. काही पुणे शहरात, तर काही पुणे ग्रामीणमध्ये हलले आहेत. मात्र, काहींनी आपले हे काळे धंदे पोलिस कारवाईतून सुटण्यासाठी ऑफलाईनवरून ऑनलाईन केले आहेत.

शहराच्या मध्यवस्तीत पिंपरीतील लालटोपीनगर झोपडपट्टीत मोबाईलवर व्हॉटसअॅपव्दारे मटका घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार कारवाई करत व्हॉट्सअॅपवर मटका घेणाऱ्या दत्ता कानडे याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून रोकड, मोबाईल असा २३ हजार सातशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार राकेश कदम (रा.काळेवाडी) हा फरार झाल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील वाढत्या गुन्हेगारीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वीच चिंता व्यक्त केली होती. रस्त्यावर उभी केलेल्या वाहनांची तोडफोड, जाळपोळ होते. व्यापाऱ्यांना धमकावण्यात येते. शहर वाढत असताना झोपडपट्ट्याही वाढत आहेत. तिथे तडीपारांचे वास्तव्य असल्याची माहिती आहे.

आता संघटित गुन्हेगारी मोडित काढा. चुकीचे वागणाऱ्याला पाठिशी घालू नका. मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी कारवाई करा. कोणाचा दबाव आला तर मला सांगा, अशा सूचना पवार यांनी पोलिसांना दिल्या आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख