पिंपरी महापालिका २१ दिवसांत उभारणार ऑक्सिजन निर्मितीचे चार प्रकल्प

हे प्रकल्प२१ दिवसांत उभारण्याची अट हे काम दिलेल्या कंपनीला घालण्यात आली आहे.
पिंपरी महापालिका २१ दिवसांत उभारणार ऑक्सिजन निर्मितीचे चार प्रकल्प
Pimpri Chinchwad Municipal Corporation will set up four oxygen generating projects :

पिंपरी : पुरवठादार तसेच उत्पादक कंपन्यांकडून सध्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यास मोठा विलंब होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने स्वतःच चार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारायचे ठरवले आहे. महापालिका रुग्णालयातच ते प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी सहा कोटी दहा लाख रुपये खर्च येणार आहे. ते सुरु झाल्यावर ४५० ऑक्सीजन बेड, तर ५० व्हेंटीलेटर बेडच्या ऑक्सीजन पुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. 

सध्याची ऑक्सिजनची कमतरता व त्याची भविष्यातील गरज लक्षात घेऊन हे ऑक्सिजन निर्मितीप्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे, असे महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले. ऑक्सिजन निर्मीती कंपन्यांकडे मागणी वाढल्याने ऑक्सिजनबरोबर त्याच्या निर्मिती प्रकल्पांचीही कमतरता लक्षात घेऊन तातडीने ते सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. ऑक्सिजन प्रश्न कायमचा मिटून त्याची बचत होणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

कोरोना काळात बऱ्यायाच भागात लोकांना ऑक्सिजनच्या अभावामुळे आपला जीव गमावावा लागत आहे. यावर उपाय म्हणून राज्यात तीनशे ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये ते बसविण्यात येणार आहेत.

सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पिंपरी-चिंचवडमध्येही रुग्णांची धावाधाव होत आहे. त्याअभावी दुर्घटना होऊ नये, म्हणून नवे भोसरी रुग्णालय, पिंपरीचे जिजामाता आणि आकुर्डी रुग्णालयात ९६० एलपीएम, तर थेरगाव रुग्णालयात १०५० एलपीएम क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत.  

दरम्यान, भोसरी रुग्णालयात आमदार निधीतील एक कोटी रुपयांतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी याअगोदरच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सादर केला आहे. त्याव्यतिरिक्त हा भोसरी रुग्णालयासाठीच पालिकेचा दुसरा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असल्याचे ढाके यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना स्पष्ट केले.

या विषयाला स्थायी समितीची मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. तसेच, हे प्रकल्प २१ दिवसांत उभारण्याची अट हे काम दिलेल्या कंपनीला घालण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in