दिलासादायक : मोटारसायकलवरून कामावर जाण्यास पुणे जिल्हा प्रशासनाची परवानगी  - Permission of Pune district administration to go to work by motorcycle | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

दिलासादायक : मोटारसायकलवरून कामावर जाण्यास पुणे जिल्हा प्रशासनाची परवानगी 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 13 जुलै 2020

पुणे जिल्ह्यातील कामगारांना मोठा दिलासा देणारा निर्णय जिल्हा प्रशासनाने सोमवारी (ता. 13 जुलै) दुपारी घेतला. त्यानुसार  अधिकारी आणि कामगारांना त्यांच्या कामाची ठिकाणी मोटारसायकलवरून जाता येणार आहे. त्याचा फायदा पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील लाखो कामगारांना होणार आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील कामगारांना मोठा दिलासा देणारा निर्णय जिल्हा प्रशासनाने सोमवारी (ता. 13 जुलै) दुपारी घेतला. त्यानुसार  अधिकारी आणि कामगारांना त्यांच्या कामाची ठिकाणी मोटारसायकलवरून जाता येणार आहे. त्याचा फायदा पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील लाखो कामगारांना होणार आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून पुण्यात 14 ते 23 जुलै दरम्यान लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउन जाहीर झाला असला तरी काही प्रमाणात उद्योग सुरू राहणार आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. बस किंवा मोटारीच्या माध्यमातून या उद्योगातील कामगार कामावर जाऊ शकतील, असे प्रशासनाने सांगितले होते.

पण, ज्या कंपनीकडे बस किंवा मोटारीची सुविधा नव्हती, त्या कंपन्यांमधील कामगार कामावर जाऊ शकत नव्हते, त्यामुळे त्यांना मोटारसायकलवरून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी संबंधित उद्योगांकडून करण्यात आली होती. यासाठी संबंधित कंपन्या, कामगार संघटनाही यांनीही मागणी लावून धरली होती. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला आहे. 

मोटारसायकलवरून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी संबंधित कामगाराला तो काम करीत असलेल्या कंपनीच्या एचआर विभागाकडून कामावर हजार राहण्यासाठी आवश्‍यक असल्याचे पत्र घ्यावे लागणार आहे. तसेच, कंपनीचे ओळखपत्रही जवळ ठेवावे लागणार आहे.

कामाच्या ठिकाणी कामगार एकटाच मोटारसायकलवरून जाऊ शकेल. त्यामुळे कात्रजमध्ये राहायला असणारा कामगार हडपसर आणि पिंपरी चिंचवडमधील काम करीत असलेल्या कंपनीत जाऊ शकेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पोलिसांनी अडविल्यास त्यांना कंपनीचे पत्र आणि ओळखपत्र दाखवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात सुमारे 1 लाख 3 हजार उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये एरवी सुमारे 17 लाख कामगार काम करतात. लॉकडाउनमुळे हे उद्योग 40 टक्के क्षमतेने सुरू असून केवळ 70 हजार उद्योग सध्या सुरू आहेत. त्यात 7 लाख कामगार काम करतात. बहुसंख्य कामगारांकडे मोटारसायकल हेच साधन आहे, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे या कामगारांना दिलासा मिळाला आहे. कामगारांच्या वाहनांना पेट्रोलही पुरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या निर्णयामुळे पहिल्या लॉकडाउनमध्ये फटका बसलेले उद्योग आणि कामगारांना आपली आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मदत होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख