भोरमध्ये रंगताहेत क्वॉरंटाइन व्यक्तींच्या पार्ट्या 

कोरोनामुळे पुणे, मुंबईहून भोर तालुक्‍यातील मूळगावी आलेल्या व्यक्तींना शाळा, हायस्कूल, समाज मंदीर किंवा इतर ठिकाणी क्वॉरंटाइन करण्यात आलेले आहे. मात्र, क्वॉरंटाइन व्यक्तींकडून रात्री खाण्या-पिण्याच्या पार्ट्या सुरू आहेत.
भोरमध्ये रंगताहेत क्वॉरंटाइन व्यक्तींच्या पार्ट्या 
Parties of quarantine persons in Bhor

भोर ः कोरोनामुळे पुणे, मुंबईहून भोर तालुक्‍यातील मूळगावी आलेल्या व्यक्तींना शाळा, हायस्कूल, समाज मंदीर किंवा इतर ठिकाणी क्वॉरंटाइन करण्यात आलेले आहे. मात्र, क्वॉरंटाइन व्यक्तींकडून रात्री खाण्या-पिण्याच्या पार्ट्या सुरू आहेत. त्यामुळे क्वॉरंटाइनचे दिवस सुखाचे, असा अनुभव सध्या ते घेत आहेत. त्यांना आवरण्यासाठी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाची मात्र तारांबळ उडत आहे. 

गावातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामसेवक किंवा तलाठी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आशा, अंगणवाडी सेविकाही कार्यरत आहेत. या शासकीय कर्मचाऱ्यांना पोलिस पाटील, सरपंच आणि ग्रामसुरक्षा दलातील तरुण सहकार्य करतात. परंतु रात्रीच्या वेळी शासकीय कर्मचारी घरी गेल्यावर क्वॉरंटाइन असलेल्या व्यक्तींची चंगळ सुरू होते. ते पार्ट्या करत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे गावाचे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते, याची जाणीव संबंधितांना नसल्याचे दिसते. 

पुणे, मुंबईहून आलेल्या व्यक्ती बऱ्यापैकी पैसे घेऊन आले आहेत. त्यामुळे ते गावातील काही तरुणांना खाण्या-पिण्याची व्यवस्था करावयास सांगतात. ते तरुणही मोठ्या खुशीने ही कामे करतात. रात्री क्वॉरंटाइनच्या ठिकाणी मैफील रमते. क्वॉरंटाइन झालेले गावातीलच ओळखीचे व भाऊंबंदकीतील असल्यामुळे त्यांना विरोध केला जात नाही. काही गावात अशा घटना घडत नाहीत. तेथील क्वॉरंटाइन व्यक्ती अगदी शांतपणे राहून कोणाच्याही संपर्कात दिसत नाहीत. परंतु मौजमजा करणाऱ्यांची संख्या मात्र जास्त आहे. 

टापरेवाडी येथील शाळेतील क्वॉरंटाइन व्यक्ती वगळता इतर कोठेही क्वॉरंटाइन व्यक्तींनी स्वच्छता, रोपांची लागवड, परिसराची साफसफाई आदी समाजहिताची कामे केलेली नाहीत. उलट क्वॉरंटाइनचा कालावधी हा आरामाचा असल्याची भावना संबंधित व्यक्तींची झालेली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. आम्ही क्वॉरंटाइन झालेल्या व्यक्तींना तपासणीसाठी गेल्यावर आमच्या लक्षातही अशा घटना आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

संबंधितांवर पोलिस कारवाई करणार ः तनपुरे 
याबाबत गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले की, क्वॉरंटाइन झालेल्या व्यक्तींचे हे वर्तन योग्य नाही, रात्रीच्या वेळी गावातील पोलिस पाटील, सरपंच व ग्रामसुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत, त्या ठिकाणच्या क्वॉरंटाइन व्यक्तींना संस्था क्वॉरंटाइनच्या ठिकाणी हलविण्यात येणार आहे. याशिवाय, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in