सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेल्या ग्रामपंचायतीत पुन्हा खुर्चीचा खेळ : सरपंचाविरोधात अविश्‍वास ठराव 

पुढील महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतीवर राज्य सरकार प्रशासक नेमण्याच्या तयारीत आहे. असे असताना हवेली तालुक्‍यातील सर्वात मोठ्या उरुळी कांचन गावच्या महिला सरपंच राजश्री वनारसे यांच्या विरोधात मात्र सोमवारी (ता. 13 जुलै) अविश्वास ठराव दाखल झाला आहे.
सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेल्या ग्रामपंचायतीत पुन्हा खुर्चीचा खेळ : सरपंचाविरोधात अविश्‍वास ठराव 
No-confidence motion filed against Sarpanch at Uruli Kanchan

उरुळी कांचन (जि. पुणे) : पुढील महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतीवर राज्य सरकार प्रशासक नेमण्याच्या तयारीत आहे. असे असताना हवेली तालुक्‍यातील सर्वात मोठ्या उरुळी कांचन गावच्या महिला सरपंच राजश्री वनारसे यांच्या विरोधात मात्र सोमवारी (ता. 13 जुलै) अविश्वास ठराव दाखल झाला आहे.

याच ग्रामपंचायतीमधील काही कारभारी दीड वर्षांपूर्वी अविश्‍वास ठरावावरून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. त्या वेळी अविश्वास ठरावाच्या वैधतेलाच थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन आव्हान देण्यात आले होते. 

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाने शब्दशः थैमान घातले असताना, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन कोरोनाशी लढा देण्याची गरज होती. मात्र, राजकारणात दंग झालेल्या सोळापैकी आठ सदस्यांनी उरुळी कांचनमधील नागरिकांना वाऱ्यावर सोडुन आपली बांधिलकी केवळ खुर्चीशी असल्याचे दाखवून दिले आहे. 

राज्य सरकारच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीला सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला असेल तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव दाखल करता येत नाही. शिरूर तालुक्‍यातील केंदूरच्या सरपंचांवर तीन महिन्यांपूर्वी अविश्वाय ठराव दाखल केला होता. मात्र, या नियमामुळे प्रशासनाला अविश्वास ठरावाचे कामकाज थांबवावे लागले होते.

ही घटना ताजी असतानाच उरुळी कांचनच्या सरपंच राजश्री वनारसे यांच्यावर सोळा सदस्यांपैकी आठ जणांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. यामुळे या अविश्वास ठरावाचे कामकाज केंदूरप्रमाणे थांबवले जाईल की ठरावावर चर्चा होणार, या कडे उरुळी कांचनच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

उरुळी कांचन ग्रामपंचायतीची मुदत पुढील महिन्यात 22 ऑगस्ट रोजी संपणार आहे. उरुळी कांचनच्या सरपंचपदी राजश्री वनारसे यांची दीड वर्षांपूर्वी निवड झाली होती. सरपंचपदी इतरांनाही संधी मिळावी, यासाठी वनारसे यांची निवड झाल्यापासूनच ग्रामपंचायत सदस्यांमधील एक गट वनारसे यांच्या राजीनाम्यासाठी प्रयत्नशील होता.

वारंवार दबाव आणूनही वनारसे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने, अखेर सोळापैकी आठ सदस्यांनी सोमवारी (ता. 13 जुलै) वनारसे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. सतरा सदस्यांच्या ग्रामपंचायतीत एका महिला सदस्याला सहा महिन्यांपूर्वी बाद ठरविल्याने सध्या सोळा सदस्य आहेत. यापैकी आठ सदस्यांनी अविश्वास ठरावावर सह्या केलेल्या आहेत. 

त्यांनी कोरोनाला हरविण्यासाठीही मदत करावी : सरपंच 

तहासील कार्यालयाकडे दाखल झालेल्या या अविश्वास ठरावाबद्दल सरपंच राजश्री वनारसे म्हणाल्या, सोळापैकी आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याची माहिती आपल्याकडे आली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव उरुळी कांचन व परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या कोरोना विरोधात सरपंच या नात्याने चोवीस तास काम करत आहे. यामुळे अविश्वास ठरावावर सध्या तरी काहीही बोलणार नाही. अविश्वास ठरावावर सह्या करणाऱ्या सदस्यांनी कोरोनाला हरविण्यासाठीही मदत करावी, एवढीच अपेक्षा आहे. 

अर्जावर दोन दिवसांत निर्णय देणार : तहसीलदार 

या संदर्भात तहसीलदार सुनील कोळी म्हणाले, "उरुळी कांचन सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाबाबतचा अर्ज आला आहे. अर्ज दाखल करुन घेतला असला तरी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1966 च्या तरतुदी व कायद्याचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. यामुळे अविश्वास ठरावाबाबतच्या अर्जावर पुढील दोन दिवसांत निर्णय दिला जाईल.'' 


Edited By : Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in