Nine members of the former Pune mayor's family are corona positive | Sarkarnama

पुण्याच्या माजी महापौरांच्या कुटुंबांतील नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 5 जुलै 2020

पुण्याच्या माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका वैशाली बनकर यांच्या कुटुंबातील नऊ जणांचा कोरोना अहवाल आज (5 जुलै) सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. या नऊ जणांवर येवलेवाडी येथील महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये (सीसीसी) उपचार करण्यात येत आहेत. 

हडपसर (पुणे) : पुण्याच्या माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका वैशाली बनकर यांच्या कुटुंबातील नऊ जणांचा कोरोना अहवाल आज (5 जुलै) सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. या नऊ जणांवर येवलेवाडी येथील महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये (सीसीसी) उपचार करण्यात येत आहेत. 

दरम्यान, नगरसेविका वैशाली बनकर आणि माजी नगरसेवक सुनील बनकर यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. सुनील बनकर यांची आई, चुलते व त्यांचा नातू, भाऊ, भावजय, चुलत भाऊ, चुलत भावजय, चुलत भाऊ व त्यांची नऊ वर्षांची मुलगी या 9 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आली आहे. 

नगरसेविका वैशाली बनकर व सुनील बनकर हे दोघेही नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रोज प्रभागात फिरत असतात. प्रभागात अनेक नागरिकांना त्यांनी आर्सेनिक-30 ह्या होमिओपॅथिक औषधांचे वाटप केले आहे. तसेच, नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिरे देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात आयोजित केली होती. 

वैशाली बनकर व माजी नगरसेवक सुनील बनकर राहत असलेल्या सातववाडी, गोंधळे नगर भागात कोरोनांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. विविध प्रश्न सोडविण्यासाठी नागरिक त्यांच्या घरी व कार्यालयात रोज येत असतात. तसेच, या भागातील नागरिकांच्या अंत्यविधीसाठी घरातील लोक जात असतात. त्यामुळेच कुटुंबातील व्यक्तींना कोरोना झाला असावा, असा अंदाज बनकर यांनी व्यक्त केला. 

पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण 

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी (ता. 5 जुलै) स्पष्ट झाले. या आठ जणांना लागण झाली असली तरी कुणालाही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार करण्यात येणार आहे. गरज पडली तरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. 

महापौर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाल्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लगेचच त्यांच्या कुटुंबियांची टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा रिपोर्ट रविवारी सायंकाळी आला. मोहोळ यांचे आई-वडील, भाऊ, भावजय, पत्नी, छोटी मुलगी, बहीण आणि भाची अशा आठ जणांचा त्यात समावेश आहे. या सर्वांना कोणताही त्रास होत नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांवर घरातच उपचार करण्यात येणार आहेत. 

महापौर मोहोळ हे गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा मुकाबला करताना प्रशासनाबरोबर आहेत. आढावा बैठका, रुग्णालयांची पाहणी, लोकांच्या भेटी असा सलग तीन महिने त्यांचा दिनक्रम सुरू होता. त्यांना लागण झाल्याने कुटुंबीयांनाही लागण झाली असावी, असे सांगण्यात येत आहे.

मोहोळ कुटुंबीय कोथरुड येथे राहात आहे. एकाच इमारतीत वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहात असल्याने विलगीकरणाच्या दृष्टीने सोयीचे आहे. त्यामुळे त्यांना घरातच ठेवण्यात येणार आहे. गरज पडली तरच रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख