राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अमराळे यांचे कोरोनामुळे निधन 

गावातील तंटे पोलिस चौकीत जाऊ न देता दत्त मंदीरातच बसवून मिटविण्याची परंपरा सुरू केली.
राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अमराळे यांचे कोरोनामुळे निधन 
NCP's Former Zilla Parishad member Subhash Amrale dies due to corona

पौड (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आदर्श सदस्य सुभाष मारूती अमराळे (वय 68) यांचे गुरुवारी (ता. 29 एप्रिल) कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन भाऊ, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

मुळशी तालुक्यातील अंबडवेट गावाला आदर्श बनविणारे, राजकारणातील संयमी, समन्वयी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पुणे जिल्ह्यात ओळख होती. मुळशीत ते भाऊ या नावाने परिचित होते. भाऊंची एक्झिट संपूर्ण मुळशी तालुक्याला चटका लावणारी ठरली असून त्यांच्या निधनामुळे मुळशी राष्ट्रवादीची मोठी हानी झाली आहे.

माजी उपसभापती (स्व.) बबनराव नागरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावत सुभाष भाऊंनी विविध विकासकामांच्या योजना, लघु पाटबंधारे, वनीकरण अशा योजना राबविल्या. बबनराव आणि सुभाषभाऊ ही अंबडवेटची अशी जोडगोळी होती की त्यांनी गावातील तंटे पोलिस चौकीत जाऊ न देता दत्त मंदीरातच बसवून मिटविण्याची परंपरा सुरू केली. त्यानंतर सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. साडेसात वर्षे गावचे सरपंचपद भूषविताना वाड्यावस्त्यांचा दूरदृष्टीने विकास केला.
    
अमराळे यांनी दूधव्यवसायाला कष्ट आणि चिकाटीची जोड देत एका उंचीवर नेऊन ठेवले. रविवार पेठेतील करपे डेअरीत दूध घालण्यापासून त्यांनी व्यवसायाला सुरूवात केली. अमराळे डेअरी नावाने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पौड, चाले याठिकाणी दूध संकलन केले जायचे, त्यामुळे माले खोरे, कोळवण खोऱ्यातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला. दूध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दांडगा जनसंपर्क आला. तालुक्याबरोबरच कोथरूड येथेही त्यांनी डेअरीचे काम सुरू केले. दर्जेदार, गुणवत्ता यामुळे अमराळे डेअरीचे दूध पुणेकरांच्या पसंतीला उतरले.

राजकारणात पाऊल टाकल्यापासून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठपणे काम केले. पक्ष सदस्यत्वापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक म्हणून त्यांनी काम केले. ते 2007 ते 2012 या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणून सर्वाधिक मतांनी विजयी झाले होते. पाच वर्षात केलेल्या कामामुळे त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श सदस्य पुरस्कार मिळाला होता. 

त्याकाळात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांकडून झालेल्या कामामुळे नंतर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. एकत्रित कुटुंबांचा आदर्शही त्यांनी तालुक्याला घालून दिला. सतत हसतमुख, मितभाषी, संयमी स्वभावाचे असलेले अमराळे यांच्याबद्दल सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आदराची भावना होती. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in