आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्‍याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी (ता. 7 जुलै) दिली. कुल त्यांच्या पुण्यातील घरी होम क्वारंटाइन झाले आहेत.
आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण 
MLA Rahul Kul infected with corona

केडगाव (पुणे)  : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्‍याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी (ता. 7 जुलै) दिली. कुल त्यांच्या पुण्यातील घरी होम क्वारंटाइन झाले आहेत. 

आमदार कुल हे आषाढी एकादशीच्या दिवशी (ता. 1 जुलै) दौंड येथे गेले होते. तेथे त्यांनी दौंड शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. तेव्हा तेथे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यास खोकला येत होता. दरम्यान, आमदार कुल हे शुक्रवारी (ता. 3 जुलै) दिल्लीला गेले होते. शनिवारी कुल यांना समजले की त्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यास कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

ही घटना समजल्याने कुल यांना धक्का बसला. कोणतीही लक्षणे दिसत नसतानाही कुल यांनी खबरदारी म्हणून 4, 5, 6 जुलै दरम्यान स्वतःला पुण्यात क्वारंटाइन केले. कुल यांनी सोमवारी (ता. 5 जुलै) स्वतःची कोरोना चाचणी केली. कुल यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरातील सर्व जण, त्यांचे स्वीय सहायक, चालक अशा आठ जणांची कोरोना चाचणी सोमवारी केली आहे. 

आमदार कुल वगळता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या कुल यांचे कुटुंबीय त्यांच्या राहू या गावी आहे. तर कुल हे पुण्यात होम क्वारंटाइन झाले असून ते घरीच सर्व उपचार घेणार आहेत. आमदार कुल यांनी त्यांच्याजवळील स्वीय सहायक, चालक या सर्वांना घरी पाठवून गेले दिले आहे. दरम्यान, राहू गावात पुढील आठ दिवसांसाठी जनता संचारबंदी पाळण्यात येणार आहे. 

पुण्यात महापौरांसह आजी माजी आमदारांना संसर्ग 

गेल्या आठवड्यापासून पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे, पुणे शहरातील माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. 


 महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. या शिवाय माजी महापौर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका वैशाली बनकर यांच्या कुटुंबातील नऊ जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर येवलेवाडी येथील महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाच रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन 

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मुंबई बंगल्यातील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने थोरात यांनीही होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. थोरात यांनी कोरोनाची चाचणी केली असून तिचा अहवाल संध्याकाळपर्यंत येणे अपेक्षित आहे. थोरात हे मुंबईकील "रॉयल स्टोन" या बंगल्यात वास्तव्यास आहेत. 

राज्य मंत्रिमंडळातील अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. हे तिघेही यावर मात करून आता दैनंदिन कामकाजात नेहमीप्रमाणे सहभागी होत आहेत. 

थोरात हे गेले काही दिवस सातत्याने फिरत आहेत. निसर्ग चक्रीवादळानिमित्त त्यांनी कोकणचा दौरा केला. तसेच संगमनेरसह राज्याच्या इतर भागांतील कोरोनाची स्थिती पाहण्यासाठी ते दौऱ्यावर होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in