चाकण (जि. पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर कार्यकर्ते आणि चाकणचे (ता. खेड) माजी सरपंच दत्तात्रेय बिरदवडे यांना हल्लाप्रकरणी आज चाकण पोलिसांनी अटक केली. मे महिन्यापासून फरारी असलेले बिरदवडे हे रात्री घरी आल्याचे त्यांचे विरोधक आणि ज्यांच्यावर हल्ला झाला आहे, त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी बिरदवडे यांना नाट्यमयरित्या अटक केली. या वेळी पोलिस आणि माजी सरपंचांमध्ये शाब्दीक बाचाबाचीही झाली.
दरम्यान, या वेळी बिरदवडे यांचे भाऊ संतोष बिरदवडे यांनाही अटक करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज तीन दिवसांपूर्वी फेटाळला. त्यामुळे पोलिसांच्या गुन्हे पथकाने राणूबाई मळ्यात त्यांच्या घराजवळून त्यांना अटक केली, अशी अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.
दत्तात्रेय बिरदवडे व त्यांचा भाऊ संतोष यांच्यावर एकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मे महिन्यापासून ते फरारी होते. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी फेटाळला. त्यामुळे पोलिस त्यांच्या शोधात होते. माजी सरपंच बिरदवडे हे त्यांच्या घरी रात्रीच्या वेळी आल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी, तसेच ज्यांच्यावर हल्ला केला होता, त्यांनी पोलिस पथकाला ही माहिती दिली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या वेळी बिरदवडे व पोलिस यांच्यात शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर पोलिसांनी बिरदवडे यांना वाहनात बसवून पोलिस ठाण्यात आणले.
बिरदवडे हे चाकणचे माजी सरपंच असून आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच, बिरदवडे यांच्या पत्नी संगीता बिरदवडे या चाकणच्या नगरसेविका आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातील राजकारणातून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. बिरदवडे यांना अटक करावी, या मागणीसाठी हे प्रकरण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, पोलिस आयुक्तांकडे नेले होते.
याबाबत आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, पोलिसांच्या कारवाईबाबत साशंकता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आहे. पोलिस यंत्रणेच्या विरोधात तक्रारी केल्याने पोलिस कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहेत. याबाबत कार्यकर्त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

