आमदार दिलीप मोहितेंना हवीय चाकण-आळंदी महानगरपालिका - MLA Dilip Mohite's demand for creation of Chakan-Alandi Municipal Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार दिलीप मोहितेंना हवीय चाकण-आळंदी महानगरपालिका

हरिदास कड 
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

खेड तालुक्‍यातील कोणतेही गाव पिंपरीत घेऊ दिले जाणार नाही.

चाकण (जि. पुणे) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची हद्दवाढ करण्याच्या हालचाली सध्या राज्य सरकार आणि महापालिकेच्या पातळीवर सुरू आहेत. या हद्दवाढीमध्ये महापालिका हद्दीलगतची खेड तालुक्‍यातील गावे समाविष्ठ करण्याबाबतचे प्रयत्न सुरू आहेत. पण, खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी तालुक्‍यातील गावे पिंपरीत जोडण्यास विरोध केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी चाकण-आळंदी ही स्वतंत्र महापालिका निर्माण करावी, अशी मागणी केली आहे. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीलगत असलेली खेड तालुक्‍यातील आळंदी, चिंबळी, कुरुळी, निघोजे, मोई, महाळुंगे, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी व इतर गावे समाविष्ट करून घेण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहेत. हद्दवाढ आणि संबंधित गावे समाविष्ठ करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्तावही गेला आहे. खेडमधील काही गावे पिंपरी घेण्याबाबतचा विषय गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. पण, हा निर्णय लालफितीत अडकला आहे. 

खेडचे लोकप्रतिनिधी असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांचा मात्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत खेड तालुक्‍यातील गावे समाविष्ट करून घेण्यास विरोध केला आहे. महापालिकेकडून तसे प्रयत्न सुरू असले तरी खेडमधील कोणतेही गाव पिंपरीत घेऊ दिले जाणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देणार आहे, असे आमदार मोहिते यांनी सांगितले. 

आमदार दिलीप मोहिते यांनी खेडमधील काही गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ठ करण्यास विरोध दर्शविला असला तरी चाकण-आळंदी स्वतंत्र महानगरपालिका करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र देणार असल्याचेही माहिते म्हणाले. 

दरम्यान, तालुक्‍यातील संबंधित गावे आणि नागरिकांचाही या निर्णयास विरोध आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी पिंपरी समावेश करण्यास विरोध दर्शविणारे ठराव केले आहेत. 

खेड तालुक्‍यातील काही गावे पिंपरीत सामविष्ठ करण्यापेक्षा चाकण-आळंदी स्वतंत्र महानगरपालिका राज्य सरकारने निर्माण करावी. चाकण, आळंदी हे पोलिस ठाणीही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात गेल्याने नागरिकांवर अन्याय होत आहे. गैरप्रकार वाढले आहेत. महाळुंगे येथे बेकायदा पोलिस चौकी सुरू करण्यात आली आहे. ती बंद करण्याबाबत गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे, असेही आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख