मंत्री वळसे पाटील आणि अशोक पवार यांच्यात या निवडीसाठी रस्सीखेच  - Minister Walse Patil and Ashok Pawar a tuff fight for this post | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

मंत्री वळसे पाटील आणि अशोक पवार यांच्यात या निवडीसाठी रस्सीखेच 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 जून 2020

दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवडीत बाजार समितीची सभापती-उपसभापती ही दोन्ही पदे शिरूर मतदारसंघातच देण्यात आली होती. त्यामुळे या वेळी दोन्ही पदे किंवा किमान सभापतिपद तरी आंबेगाव मतदारसंघाला मिळावे, अशी आग्रही मागणी या भागातून होत आहे.

शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी 15 जून रोजी राजीनामा दिला आहे. इतरांना संधी मिळावी म्हणून हा राजीनामा घेण्यात आला आहे. मात्र, उपसभापतींचा राजीनामा सभापतींकडे अद्याप आलेला नाही, त्यामुळे या पदाची निवड लांबण्याची शक्‍यता आहे. 

शिरूर तालुका हा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. तालुक्‍यातील 39 गावे आंबेगाव मतदारसंघाला जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील या दोन्ही विभागाला स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी देताना नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागते. सध्याही सभापती-उपसभापती निवडीत शिरूर-आंबेगाव हा समतोल साधण्याचे आव्हान असणार आहे. 

दरम्यान, दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवडीत बाजार समितीची सभापती-उपसभापती ही दोन्ही पदे शिरूर मतदारसंघातच देण्यात आली होती. त्यामुळे या वेळी दोन्ही पदे किंवा किमान सभापतिपद तरी आंबेगाव मतदारसंघाला मिळावे, अशी आग्रही मागणी या भागातून होत आहे.

बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार व मानसिंग पाचुंदकर यांनी त्यासाठी कंबर कसली आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेटी घेऊन त्यांना विभागीय अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. या विभागीय अस्मितेला विरोधी भारतीय जनता पक्षाच्या तीन संचालकांचेही पाठबळ मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यामुळे विरोधी संचालकांचा कौल गृहीत धरून खेळी खेळल्या जात आहेत. 

दरम्यान, बाजार समितीच्या सभापतिपदासाठी आबाराजे मांढरे, शंकर जांभळकर यांची नावे चर्चेत होती. पण त्याबरोबर सध्या ऍड. वसंतराव कोरेकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. ऍड. कोरेकर हे सर्वांत ज्येष्ठ संचालक आहेत. 

शिरूर-न्हावरे जिल्हा परिषद गटाच्या 1999 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेल्या घड्याळ या अधिकृत पक्षचिन्हावर प्रथम विजयाचा झेंडा फडकावला होता. गेल्या वीस वर्षांत त्यांना त्याव्यतिरिक्त मोठी राजकीय संधी मिळू शकली नव्हती. त्यामुळे त्यांना सभापतिपदाची संधी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. 

शिरूर तालुक्‍यातील 39 गावे आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेली आहेत. या भागातून पाच संचालक निवडून आलेले आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर आमदार ऍड. अशोक पवार हे राजकीय कौशल्य वापरून बाजार समिती पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्वतःचे वर्चस्व कसे अबाधित ठेवणार, या कडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम सहायक निबंधकांनी जाहीर केला आहे. 29 जून रोजी होणाऱ्या या निवडीला आठच दिवस उरल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आंबेगाव-शिरूरचा मुद्दा पुढे आल्याने उपसभापती निवड काही कालावधीसाठी पुढे ढकलण्याची खेळी नेतेमंडळींनी केल्याची चर्चा आहे. 

"पंचायत समिती पॅटर्न'ची चर्चा 

शिरूर पंचायत समितीमध्येही गतवर्षी इतरांना संधी मिळावी; म्हणून पदाधिकारी बदलले होते. मात्र, तेव्हाही केवळ सभापती सुभाष उमाप यांचा राजीनामा घेऊन उपसभापती मोनिका हरगुडे यांचा काही कालावधीनंतर राजीनामा घेण्यात आला होता. पुढे त्यांना सभापतिपदाचीही संधी देण्यात आली. हा "पंचायत समिती पॅटर्न' बाजार समितीतही राबविला गेल्यास उपसभापती विश्‍वास ढमढेरे यांना सभापतिपदी बढती मिळू शकते, अशी राजकीय पटलावर चर्चा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख