बाबरीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या अमृत पऱ्हाडांचा आनंद गगनात मावेना 

अयोध्येत1992 मध्ये बाबरी मशिदीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले; म्हणून ज्यांना त्याच दिवशी रामजन्मभूमीवर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली, ते भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवडचे (भोसरी, जि. पुणे) माजी नगरसेवक अमृत पऱ्हाड आजही पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींवर जे गुन्हे दाखल आहेत, त्यात पऱ्हाडही सहआरोपी आहेत.
Memories of the demolition of Babri Masjid narrated by Amrut Parhad
Memories of the demolition of Babri Masjid narrated by Amrut Parhad

शिक्रापूर (जि. पुणे) : अयोध्येत 1992 मध्ये बाबरी मशिदीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले; म्हणून ज्यांना त्याच दिवशी रामजन्मभूमीवर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली, ते भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवडचे (भोसरी, जि. पुणे) माजी नगरसेवक अमृत पऱ्हाड आजही पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींवर जे गुन्हे दाखल आहेत, त्यात पऱ्हाडही सहआरोपी आहेत. "राम मंदिर पाहण्यासाठी मी अजूनही जिवंत आहे,' असे सांगून पऱ्हाड यांनी त्यांच्या न झालेल्या मृत्यूच्या आठवणी जागविल्या. 

महाराष्ट्रातून 3 डिसेंबर 1992 रोजी निघालेले हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी कारसेवेच्या उद्देशाने रेल्वेने 6 डिसेंबर 1992 रोजी दिल्लीत उतरले. राज्यातील तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अण्णा डांगे, प्रकाश जावडेकर, धरमचंद चोरडीया, ना. स. फरांदे, किरीट सोमय्या, जयसिंगराव गायकवाड, गिरीश बापट, विमल मुंदडा, जयश्री पलांडे, अमृत पऱ्हाड, हेमंत रासने, योगेश गोगावले, उज्ज्वल केसकर, विकास मठकरी, मिलींद एकबोटे, विजय काळे, जोत्सना सरदेशपांडे आदींसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता. त्यात शिवसेनेचे पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक नेते, शिवसैनिक आदींचाही सहभाग होता. 

सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांच्या या ताफ्यात शिरूर तालुक्‍यातील भारतीय जनता पक्षाच्या 240 कारसेवकांचे नेतृत्व सध्याच्या शिवसेना नेत्या जयश्री पलांडे यांनी केले होते. त्यांच्या समवेत असणारे मूळचे शिरूर तालुक्‍यातील केंदूर येथील पिंपरी-चिंचवडचे भाजपचे तत्कालीन नगरसेवक अमृत पऱ्हाड हे पक्षाचे त्या वेळचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव शितोळे यांच्यासह आघाडीवर होते. तब्बल 16 तासांची पायपीट आणि उपलब्ध चारचाकी गाड्यांमधून 4 डिसेंबर रोजी सर्व कारसेवक दिल्लीतून अयोध्येला निघाले. सुमारे दहा ते बारा तासांचा प्रवास करून 6 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास हा सर्व लवाजमा अयोध्येला पोचला. 

साधारण दहाच्या सुमारास उपस्थित नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कारसेवक बाबरी मशिदीकडे झेपावले. याच काळात पोलिसांची धावपळ सुरू असताना साधारण अकराच्या सुमारास अमृत पऱ्हाड बाबरी मशिदीच्या ढाच्याखाली गाडले गेल्याचा एकच गलका झाला. ढाच्याखाली अनेक जण गाडले गेले होते आणि त्यातील काहींना बाहेर काढण्यात यश आले. पण, अमृत पऱ्हाड यांचा काही केल्या शोध लागेना. 

राम मंदिर उभारणीचे स्वप्न, बाबरी मशिदीचा ढाचा कोसळल्याने त्या दिशेने एक पाऊल पडल्याचे समाधान यामध्ये सगळे दंग होते. मात्र, महाराष्ट्रातील पथकाला अमृत पऱ्हाडांचा शोध लागत नसल्याने सर्वजण चिंतेत होते. रामजन्म भूमीवरच बाबरीच्या ढिगाऱ्याखाली सापडून पऱ्हाड यांचा मृत्यू झाला असावा, यावर सर्वांचेच एकमत झाले आणि त्या धामधूमीतही पऱ्हाड यांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. 

श्रध्दांजली कार्यक्रम संपताच बाबरी मशिदीच्या पलिकडच्या बाजूने अमृत पऱ्हाडांचे पाय काही कारसेवकांना दिसल्याचा आवाज झाला. सगळे नेते-कार्यकर्ते त्या दिशेने धावले. सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर पलांडे व त्यांच्या सहकारी कारसेवकांनी पऱ्हाडांच्या पायाला धरुन अक्षरश: ओढून बाहेर काढले. आश्‍चर्य म्हणजे पऱ्हाड हे त्या वेळी जीवंत होते. त्यांना तातडीने फैजाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. राम मंदिरासाठी आम्ही जे केले, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. शिवाय आमच्याच हयातीत राम मंदिर उभे राहतंय त्याचा अभिमान वाटतो, असे पऱ्हाड आणि पलांडे यांनी सांगितले. 


पऱ्हाडांनी व्यक्त केली लाखो कारसेवकांची खंत 

बाबरी मशिदीचा ढाचा अंगावर पडल्यावर काहीच हालचाल करता येईना. काही वेळ गडबड, गोंधळ ऐकू येत असताना पुढे काहीच समजेनासे झाले. त्यानंतर बेशुद्ध पडलेलो मी 15 डिसेंबर रोजीच शुद्धीवर आलो. त्या वेळी बाबरी मशिद पाडण्याच्या घटनेतील मी आरोपी असल्याचे तेथील पोलिसांनी रुग्णालयातच मला सांगितले. त्याच रुग्णालयात एक बॉंबस्फोट झाला आणि आम्ही पुन्हा एकदा मेल्यासारखे पडून राहिलो. अर्थात, एका मागोमाग एक संकटांनी मी बेजार झालो होतो, तरीही बाबरीच्या प्रकरणातला सहभाग होता, हे नाकारण्याचे मला कोणतेही कारण नव्हते. कारण, बाबरी मशिदीच्या ढिगाऱ्याखाली मी सापडणे, हेच माझे आरोप सिद्ध करणारा पुरावा होता.

या प्रकरणाची सुनावणी अद्यापही सुरू आहे. मात्र, उद्याच्या (ता.5 ऑगस्ट) राम मंदिर शिलान्यासाच्या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, साध्वी ऋतुंभरा, उमा भारती आदी नेते असायला हवे आहेत, अशी खंत पऱ्हाड यांनी बोलून दाखवली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com