सरकारविरोधात आंदोलन केल्यानंतर महापौर म्हणाले, ``कोरोनाबाबत राजकारण करू नये`` - Mayor Murlidhar Mohoal participates in anto govt agitation and then participates in meeting | Politics Marathi News - Sarkarnama

सरकारविरोधात आंदोलन केल्यानंतर महापौर म्हणाले, ``कोरोनाबाबत राजकारण करू नये``

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 22 मे 2020

उपमुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीचा सोपस्कार पूर्ण  करताना मोहोळांनी पालकमंत्र्यांकडे पुणेकरांच्या मागण्यांची लांबलचक यादीही दिली.

पुणे : कोरोनाला रोखण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ शुक्रवारी सकाळी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले; पण पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हेच महापौर दुपारी मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांसमवेतच्या बैठकीला हजर राहिले.

उपमुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीचा सोपस्कार पूर्ण  करताना मोहोळांनी पालकमंत्र्यांकडे पुणेकरांच्या मागण्यांची लांबलचक यादीही दिली. कोरोनाच्या मुद्यावरून राज्यातील विरोधकांनी अर्थात भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, कोरोनाला गर्दीची बाधा असूनही भाजप नेते आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. या आंदोलनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र बचाओ'ची हाक देण्यात आली. पुण्यातील आंदोलनात भाजप शहराध्य जगदीश मुळीक यांच्यासह महापौर मोहोळही रस्त्यावर उतरले. तेव्हा, याच महापौरांनी सरकारवर घणाघाती टीकाही केली. त्यानंतर मात्र, नियोजित पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीला महापौर मोहोळ वेळेत उपस्थित राहिले. दरम्यान कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने केलेल्या कामांसह पुढच्या नियोजनाचा पवार यांनी शुक्रवारी आढावा घेतला.

महापौर मोहोळ म्हणाले, "मी कधी आंदोलन केले आणि कोणासोबत बैठकीला होतो, यापेक्षा माझा पुणेकर नागरिक कोरोनापासून सुरक्षित राहिला पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्यावरून राजकारण करू नये. सध्या पुणे शहराला आणि कोरोनाविरोधातील मोहिमेत जे काही अपेक्षित आहे, त्याबाबत मी सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. विशेषत: नागरिकांच्या तपासणीची क्षमता वाढविण्याचा माझा आग्रह आहे.''

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी, नवल किशोर राम, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शहरातील कोणत्या भागांत रुग्ण आहेत, त्यांच्या वाढीचा वेग, बाधित क्षेत्र आणि त्याबाहेरील हद्दीतील रुग्ण वाढीचे प्रमाण, मृत्यू दर, मृतांची कारणे, लॉकडाउनमधील शिथिलता, त्याचे परिणाम, याची सविस्तर माहिती रुबल अग्रवाल यांनी पवार यांना दिले. दरम्यान, स्मार्टसिटीने निर्माण केलेल्या "डॅशबोर्ड'सह सर्व यंत्रणेची माहिती जाणून घेताच त्याबाबत पवार यांनी समाधानही व्यक्त केले. 

पवार म्हणाले, "कोरोनाच्या संकटाचा सामाना एकत्रित करायचा आहे. रोज सापडणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना, नव्या रुग्ण आढळून येणार नाहीत, यादृष्टीने कठोर नियोजन करा. या मोहिमेसाठी जिथे कुठे निधी लागेल, त्यासाठी मोकळेपणाने मागणी करा, पुरेशा प्रमाणात निधी पुरविण्यात येईल.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख