पश्चिम महाराष्ट्रातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महावितरणचा मोठा निर्णय - Mahavitaran provides relief to farmers in Western Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्रातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महावितरणचा मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

महावितरणने राज्यातील कृषिपंपधारकांसाठी कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत वीजबील माफीची योजना जाहीर केली आहे.

पुणे : महावितरणने राज्यातील कृषिपंपधारकांसाठी कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत वीजबील माफीची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील कृषिपंपधारकांसह 12 लाख 46 हजार 455 कृषी वीजग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्याकडील तब्बल 2 हजार 638 कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आली आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील या ग्राहकांकडे सद्यस्थितीत 10 हजार 824 कोटी 56 लाख रुपयांची थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण 2638 कोटी 51 लाख रुपये माफ केले आहेत. या ग्राहकांनी उरलेल्या 8 हजार 186 कोटींच्या मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम पुढील वर्षभरात भरल्यास थकबाकीची उर्वरित 50 टक्के म्हणजे 4 हजार 93 कोटींची रक्कम माफ केले जाईल. 

कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 मध्ये प्रामुख्याने कृषिपंपासह सर्व उच्च व लघुदाब कृषी ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांचा समावेश आहे. या ग्राहकांच्या 5 वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर 2015 पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार 100 टक्के माफ केले आहे.

पुणे जिल्ह्यात 3 हजार 88 कोटी 80 लाख रुपयांची थकबाकी 
पुणे जिल्ह्यातील 3 लाख 11 हजार 136 कृषी ग्राहकांकडे 3 हजार 88 कोटी 80 लाख रुपयांची थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे 656 कोटी 82 लाख माफ केले आहेत. उरलेल्या मूळ थकबाकीच्या 2 हजार 431 कोटी 97 लाखांपैकी 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 50 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.

अशी मिळवा माहिती

वीजबिल थकबाकीमुक्तीची ही योजना अत्यंत महत्वाची असल्याने महावितरणकडून जिल्ह्यातील कृषी ग्राहकांशी थेट संवाद साधून या योजनेची माहिती देण्यात येत आहे. कृषी ग्राहकांना वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम ही माहिती महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. केवळ ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर ही माहिती मिळते. या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख