कॉंग्रेसच्या मंत्र्यांचे चालत नाही, अशा सरकारमधून बाहेर पडा : कार्यकर्त्यांचे सोनिया गांधींना पत्र  - Letter from Congress workers in Alandi to Sonia Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेसच्या मंत्र्यांचे चालत नाही, अशा सरकारमधून बाहेर पडा : कार्यकर्त्यांचे सोनिया गांधींना पत्र 

विलास काटे 
सोमवार, 20 जुलै 2020

आधी नोटबंदी आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील जनता आर्थिक संकटात आहे. अशावेळी शिक्षण सम्राटांकडून आजही शालेय शिक्षणाच्या शुल्कासाठी विद्यार्थ्यांकडे तगादा लावला जात आहे. शालेय शुल्क आणि वाढीव वीजबिलांपासून नागरिकांना दिलासा मिळावा; म्हणून पत्रव्यवहार करूनही राज्यातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडून अद्याप न्याय दिला जात नसल्याची तक्रार आळंदीतील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी केली आहे. 

आळंदी (जि. पुणे) : आधी नोटबंदी आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील जनता आर्थिक संकटात आहे. अशावेळी शिक्षण सम्राटांकडून आजही शालेय शिक्षणाच्या शुल्कासाठी विद्यार्थ्यांकडे तगादा लावला जात आहे. शालेय शुल्क आणि वाढीव वीजबिलांपासून नागरिकांना दिलासा मिळावा; म्हणून पत्रव्यवहार करूनही राज्यातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडून अद्याप न्याय दिला जात नसल्याची तक्रार आळंदीतील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी केली आहे. 

आळंदीतील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यानी थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना पत्रव्यवहार करून राज्यातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांना सदबुद्धी देण्याबाबतची विनंती केली आहे. एवढ्यावरच न थांबता शालेय शुल्क आणि वीज बीलाबाबत दिलासादायक भूमिका न घेतल्यास कॉंग्रेस मंत्र्यांच्या विरोधात आळंदीत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशाराही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

याबाबतचे निवेदन शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, शहर सचिव संदिप नाईकरे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष योगेश सातपुते यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले की, राज्यातील काही मंत्री वैयक्तिक स्वार्थासाठी मंत्रिपदाचा वापर करत असतील तर कॉंग्रेसने महाआघाडीतून बाहेर पडलेले बरे. पक्षाची प्रतिमा मलिन होत असताना राज्यातील कॉंग्रेसच्या मंत्र्यांना लोकहिताला प्राधान्य देण्याचे आदेश देवून काम करण्यास सांगावे, असे साकडे कार्यकर्त्यांनी थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना घातले आहे. 

महाविकास आघाडीत पक्षातील कार्यकर्त्यांची फसवणूक होत आहे. राज्यातील जनतेला पक्षाच्या मत्र्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. कोरोनामुळे टाळेबंदी झाली आणि सर्वसामान्यांच्या हाती पैसे नसतानाही हजारो रुपयांची वीजबिले पाठवली जात आहे. राज्यात खासगी आणि विनाअनुदानित शाळा मोठ्या प्रमाणात आहे. सीबीएसई आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा सध्या बंद आहेत. तरीही ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शिक्षणसंस्थांनी त्याच्या खर्चाचा बोजा आता पालकांच्या माथी मारण्यास सुरुवात केली. शाळेचे शुल्क वाढवून फीसाठी तगादा लावला जात आहे. मुलाला शाळेतून काढून टाकण्यात येईल, असे सांगितले जात आहे. 

लॉकडाउनमुळे लोकांच्या हाताला काम नाही. अनेकांना कंपन्या, खासगी संस्थांमधून नोकरीवरून कमी केले. जे नोकरीत आहेत, त्यांना निम्मा पगार दिला जात आहे. काहींना आजारपणावर पैसे खर्च होत आहेत. सरकारकडून मात्र दिलासा दिला जात नाही. मात्र शिक्षण संस्थांकडून पालकांना शुल्काबाबत रोज फोन केले जातात. आजपर्यंत एकाही शाळेवर कारवाई नाही. तीच अवस्था विजबिलांची आहे. 

लॉकडाउनच्या कालावधीत शेतीमालाला किंमत मिळत नाही. परिणामी बांधावरच माल फेकून द्यावा लागला. शेतकरी, कामगार वर्गाला बीजबिलाची मोठी झळ बसली. राज्यातील कॉंग्रेसच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उर्जामंत्री नितीन राऊत यांना कार्यकर्त्यांनी आळंदीतून पत्रव्यवहार केला. प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही पत्र लिहिले. मात्र, कोणीही दखल घेतली नाही. सरकारमध्ये कॉंग्रेसचे चालत नाही. जनतेची कामे होत नसतील, तर अशा सरकारमध्ये पक्षाने कशाला राहावे, अशी भूमिका कॉंग्रेसचे आळंदी शहराध्यक्ष वडगावकर यांनी सांगितले. 

कॉंग्रेस पक्ष आणि पक्षाच्या राज्यातील मंत्र्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत जाग यावी, यासाठी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा आळंदीतील कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे दिला. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख