बारामतीला हुलकावणी देणारा 'तो' अखेर जेरबंद  - A leopard was caught at Katewadi in Baramati | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

बारामतीला हुलकावणी देणारा 'तो' अखेर जेरबंद 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 7 जून 2020

बारामतीला गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाला हुलकावणी देणारा बिबट्या अखेर रविवारी (ता. 7) सकाळी जेरबंद झाला. काटेवाडी (ता. बारामती) येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये ही बिबट्याची मादी सापडली आहे. ही माहिती मिळताच या ठिकाणी आज सकाळपासूनच बघ्यांनी गर्दी करण्यास प्रारंभ केला होता. 

बारामती :  बारामतीला गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाला हुलकावणी देणारा बिबट्या अखेर रविवारी (ता. 7) सकाळी जेरबंद झाला. काटेवाडी (ता. बारामती) येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये ही बिबट्याची मादी सापडली आहे. ही माहिती मिळताच या ठिकाणी आज सकाळपासूनच बघ्यांनी गर्दी करण्यास प्रारंभ केला होता. 

वन विभागाने या बिबट्याला ताब्यात घेतले आहे. काटेवाडी येथील संतोष जाधव यांच्या शेतामध्ये हा बिबट्या सापडला. या पूर्वीदेखील दोन बिबटे याच ठिकाणी वन विभागाने जेरबंद केले होते. आज पकडण्यात आलेला हा तिसरा बिबट्या आहे. 

मध्यंतरी कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे लोकांना बिबट्याचा वावर असल्याचा विसर पडला होता. आज अचानक वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये सकाळी हा बिबट्या सापडल्याने परत एकदा खळबळ उडाली आहे. मात्र हा बिबट्या जेरबंद झाल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. हा तिसरा बिबट्या पकडल्याने बारामती तालुक्‍यातील बिबट्यांचे अस्तित्व आता संपुष्टात आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

 

गेल्या अनेक दिवसांपासून बारामती तालुक्‍यातील काटेवाडी-कण्हेरी परिसरात बिबट्याचा वावर होता. सर्वप्रथम बारामती एमआयडीसीतील बाऊली या कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कंपनीच्या आवारात फिरताना दिसला होता. त्या नंतर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे लक्षात आल्याने या भागात दहशतीचे वातावरण होते. सूर्यास्तानंतर घराबाहेर पडायचे लोक टाळत होते, रात्रीच्या वेळेस शेतात जाणेही लोकांनी सोडून दिले होते. एकाहून अधिक बिबटे या परिसरात असल्याची चर्चा होती, ती खरी ठरली. आज अखेर तिसऱ्या बिबट्यास वन विभागाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. 

बारामती वन विभागात चिंकारा हरिणाचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. बिबट्यांना त्याची चाहूल लागल्यामुळे त्यांची संख्या वाढेल की काय, अशी भीती वन्यजीव प्रेमींमधून व्यक्त होत होती. बारामतीच्या इतिसहात प्रथमच बिबटयाचा वावर तालुक्‍यात झाल्यानंतर चिंतेचे वातावरण होते. आतापर्यंत तीन बिबटे जेरबंद झाल्यानंतर लोकांनी अखेर सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख