"लॉकडाउन'च्या जाळ्यात काळी मैना!

श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांअभावी डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जंगलातील जाळीतच लॉकडाउन झाली आहेत.
Karvanda is not selling due to Lockdown
Karvanda is not selling due to Lockdown

घोडेगाव ः श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांअभावी डोंगराची  काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जंगलातील जाळीतच लॉकडाउन झाली आहेत. त्यामुळे आदिवासींचा रोजगार व उत्पन्न यावर मोठा परिणाम झाला आहे. कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने गावागावांत दिसणारी करवंदे आता पहायलासुद्धा मिळत नाहीत. या वर्षी हा रानमेवा जंगलातच राहणार की काय, अशी परिस्थिती आहे. 

आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागात डोंगरदऱ्यात असलेली करवंदे बहरून आलेली आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जंगलाचा रानमेवा जाळीतच लॉकडाउन झाला आहे. लॉकडाउन संपेल आणि आपल्याला करवंदे विकता येतील, अशी अशा आदिवासी बांधवांना आहे. पण, लॉकडाउनमुळे गावोगावी भरणारी जत्रा, आठवडे बाजार बंद झाल्यामुळे भीमाशंकर, आहुपे, पाटण या भागांत व वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासी बांधवांचा करवंदे विकण्याचा हक्काचा रोजगार बुडाला आहे. या भागातील डोंगररांगामध्ये काळ्या मैनेची मोठमोठी जाळी आहेत. उन्हाळ्यात हा रानमेवा बहरतो. स्थानिक आदिवासी बांधव पहाटेपासून व रखरखत्या उन्हाची पर्वा न करता हा रानमेवा जमा करतात. 

आंबेगाव तालुक्‍यातील मंचर, घोडेगाव, शिनोली, डिंभे आदी गावांतील आठवडा बाजारात व त्यांच्या लगतच्या वाड्यावस्त्यांवर विक्रीसाठी नेत असतात. श्री क्षेत्र भीमाशंकरला येणारे भाविक, पर्यटक यांनाही येथील लहान मुले रस्त्यांवर उभे राहून हा डोंगरातील रानमेवा विकून आई-वडिलांना आर्थिक हातभार लावत असतात. हा रानमेवा विकून आलेल्या पैशातून ते वह्या-पुस्तके खरेदी करतात. या करवंदांना ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या व्यवसायातून त्यांची रोजी-रोटी भागते. 

रानमेव्याची किरकोळ विक्री दहा रूपये ग्लास, तर दीडशे ते दोनशे रूपये प्रतिकिलोने केली जाते. चविष्ट, आंबट गोड, रसाळ रानमेवा जिभेवर ठेवताच त्याच्या विशिष्ट चवीची आठवण उन्हाळाभर कायम राहते. मात्र या वर्षी लॉकडाउनमुळे गतवर्षीच्या आठवणीत दिवस काढावे लागण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com