चोरीच्या लग्नाचा मामला आता तरी थांबवा; नाहीतर हाती पडतील पोलिसांच्या बेड्या

आळंदीत चोरून होणाऱ्या लग्नाबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. शहरातील मंगल कार्यालयात अशी चोरून लग्न लावल्यास वधूवरांसह वऱ्हाडी आणि मंगल कार्यालय चालकांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
चोरीच्या लग्नाचा मामला आता तरी थांबवा; नाहीतर हाती पडतील पोलिसांच्या बेड्या
If you get married illegally, a criminal case will be filed in Alandi

आळंदी ः आळंदीत चोरून होणाऱ्या लग्नाबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. शहरातील मंगल कार्यालयात अशी चोरून लग्न लावल्यास वधूवरांसह वऱ्हाडी आणि मंगल कार्यालय चालकांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आळंदीचे मुख्याधिकारी समीर भूमकर आणि आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालयातून लग्न लावण्यास बंदी आहे. मात्र अद्याप काही समाज उपद्रवी लोक आळंदीत चोरून लग्ने लावत आहे. तसेच सलून, हॉटेल, पान टपऱ्यांनाही बंदी असूनही त्या उघड्या ठेवून सामानाची विक्री करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. अशा व्यावसायिकांवर कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिस आणि पालिका संयुक्त कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करणार आहेत, असे भूमकर आणि चौधर यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील इतर व्यावसायिकांची दुकाने पाच जूनपासून दिवसाआड सम-विषम तारखेला सुरू ठेवली जाणार आहेत. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक चौधर आणि मुख्याधिकारी भूमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आळंदीत सलून आणि हॉटेलमधून छुप्या पद्धतीने आर्थिक व्यवहार सुरू आहेत. शहरातील पान टपऱ्यांमधून पान तंबाखूची विक्री केली जात आहे. अशा व्यावसायिकांना दुकाने चालू ठेवण्यास प्रशासनाकडून अद्याप परवानगीचे आदेश दिले नसल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत दुकाने बंद राहतील. जिल्हाधिकाऱ्यांनी 31 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार केश कर्तनालय, पान टपऱ्या, हॉटेल आणि चहाच्या दुकानांना बंदी आहे. 

दोघांवर गुन्हा दाखल 

आळंदीत बंदी असतानाही छुप्या पद्धतीने मंगल कार्यालयवाले लग्न लावत आहे. चोरून लग्न लावल्याप्रकरणी पोलिसांनी नुकतेच दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगल कार्यालयांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी नाही. छुप्या पद्दतीने चोरून लग्ने केल्यास गुन्हा दाखल केला जाईल. आळंदीत सध्या पन्नास मंगल कार्यालयांची नोंद पालिका पोलिसांकडे आहे. तसेच बिगरनोंद असलेली चारशेहून अधिक ठिकाणी लग्ने लागतात. यामधे काही लोक स्वःताच्या घरात लग्नाचा व्यवसाय करत आहे. पुणे, पिंपरी, खेड, तसेच जिल्ह्यांतून आलेल्या वऱ्हाडींची लग्ने आळंदीत काही लोक चोरून लावत आहेत. नगरपालिका अथवा पोलिसांनी अद्याप कोणालाही लग्नासाठी परवानगी दिली नाही. 

...तर आळंदीकरांचे आरोग्य धोक्‍यात येईल 

आळंदीत एकाच वेळी एवढ्या कार्यालयात लग्ने लागली, तर एकाच वेळी किमान पाच हजार वऱ्हाडी आळंदीत पुणे, पिंपरी शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागातून आले तर आळंदीकरांचे आरोग्य धोक्‍यात येईल. आजपर्यंत आळंदीकरांनी स्वतः घरात राहून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध पाळले आहेत. मात्र मंगल कार्यालय चालकांच्या चुकीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ही शक्‍यता लक्षात घेऊन खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी आळंदीतील लग्नांना यापूर्वीच बंदी घातली. मात्र आजही काही समाज उपद्रवी लोकांनी स्वःताच्या घरातच मंगल कार्यालय बनविल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत चोरून लग्न लावणाऱ्यांवर आजपासून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

दुचाकीवरही एकट्यानेच प्रवास करावा 

पाच जूनपासून समविषम तारखेला दुकाने चालु राहतील. याबाबत पालिका आराखडा तयार करत आहे. सायंकाळी पाचनंतर दुकाने चालू राहिल्यास पोलिस कारवाई करतील. दुचाकीवरही एकच व्यक्तीने प्रवास करावा. ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून फिरण्यास मज्जाव आहे. आपल्या शेजारी नवीन व्यक्ती आल्यास पालिका अथवा पोलिसांना तत्काळ रात्री अपरात्री कधीही फोनवरून माहिती देण्याचे आवाहनही या वेळी पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून करण्यात आले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in