शिक्रापूर (जि. पुणे) : एक जानेवारी रोजीच्या अभिवादन दिनाला उपस्थित राहण्यासाठी पुणे जिल्हा पोलिसांच्या वतीने प्रवेश पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केवळ पासधारकांनाच पेरणे येथील विजय स्तंभाला अभिवादन करता येणार आहे. पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, शिक्रापूर आणि लोणीकंद पोलिस ठाण्यात हे पास वैयक्तिकरित्या अर्ज करून मिळविता येतील, असे पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
दरम्यान, कोरेगाव भीमा परिसरातील 18 गावांमध्ये या पुढील काळात ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय या वेळी डॉ. देशमुख यांनी जाहीर केला.
अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. देशमुख यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. देशमुख यांनी जिल्हा पोलिसांची पूर्वतयारी, प्रतिबंधात्मक कारवाई, पोलिस फौजफाटा, अभिवादनासाठी येणाऱ्यांची प्रवेश पद्धती, तसेच त्या दिवशीच्या कार्यक्रमाची रुपरेषा याबद्दल माहिती दिली.
देशमुख यांनी सांगितले की, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शिक्रापूर (ता. शिरूर) व लोणीकंद (ता. हवेली) पोलिस ठाण्याच्या हद्दीत 144 कलम लागू केल्याने पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित थांबणे गुन्हा आहे. कोरेगाव-भीमा परिसरातील 18 गावांमधील दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू राहणार असून या गावांमध्ये कुणाही नवीन व्यक्तीला यायचे असेल त्यांना जिल्हा पोलिसांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.
दरम्यान, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुमारे 100 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्वांना 2 जानेवारी 2021 पर्यंत हद्दपार करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. या वर्षी दरवर्षीच्या तुलनेत पोलिस फौजफाटा काही प्रमाणात कमी करण्यात येणार असला तरी अन्य कुठल्याही जिल्ह्यातील कुणीही व्यक्ती 1 जानेवारी रोजी पुणे जिल्हा पोलिसांच्या परवानगी शिवाय तसेच प्रवेश पास घेतल्याशिवाय कोरेगाव भीमा तसेच पेरणे परिसरात प्रवेश करू शकणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांतील हद्दीवर नाकेबंदीची उपाय योजना करण्यासाठीही गृहखात्याकडून सूचित करण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
एमआयडीसी, बाजारपेठा सुरू राहणार
सणसवाडी-शिक्रापूर-कोरेगाव भीमा परिसरातील औद्योगिक क्षेत्र व बाजारपेठांसाठी जिल्हा पोलिसांचा कुठलाही वेगळा निर्णय नाही. वाहतूक व्यवस्थेतील बदल आणि ओळखपत्राशिवाय प्रवेश या दोन निकषांशिवाय दोन्ही क्षेत्रे 1 जानेवारी रोजी सुरळीतपणे चालू राहतील, याची दक्षताही जिल्हा पोलिस घेत असल्याचेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
मोबाईल नेटवर्क, इंटरनेटबाबत लवचिक धोरण
कोरेगाव-भीमा परिसरातील 18 गावांच्या परिसरात मोबाईल नेटवर्क व विशेषत: इंटरनेट सुविधा ता. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, परिस्थिती पाहून हा निर्णय बदलण्याची प्रशासकीय लवचिकताही ठेवण्यात आली आहे, असे डॉ. देशमुख यांनी नमूद केले.

